प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मान्सूनपूर्व तयारीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलावण्यात आलेल्या बैठकीकडे तब्बल १३ विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तासगाव तालुक्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.या प्रकारामुळे संतप्त वातावरण निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.दरम्यान,बाजार समिती माजी सभापती रवींद्र पाटील यांनी ११ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे.आमदार रोहित पाटील यांच्या पुढाकारातून सोमवारी तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. तहसीलदार अतुल पाटोळे यांनी २४ विभागांच्या प्रमुखांना पूर्वसूचना दिली होती.मात्र प्रत्यक्ष बैठकीवेळी धक्कादायक चित्र समोर आले.अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले.तहसीलदारांनी संपर्क साधल्यानंतर केवळ ११ विभागांचे अधिकारी उपस्थित राहिले.यामध्येही केवळ तीन विभाग प्रमुख स्वतः उपस्थित होते, तर उर्वरित आठ विभागांनी प्रतिनिधींना पाठवून केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचे दिसून आले. त्यामुळे बैठकीच्या गांभीर्याबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता उघड झाली.
या प्रकारामुळे संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे आमदार रोहित पाटील संतप्त झाले. “आमदाराने बोलावलेल्या बैठकीलाच अधिकारी येत नसतील, तर प्रशासनाची जबाबदारी कुठे आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.मान्सूनपूर्व तयारीकडे दुर्लक्ष अजिबात सहन केले जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.अखेर या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून बैठक रद्द करण्यात आली.दरम्यान, या घटनेनंतर आमदारांच्या समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांनी बैठकीला दांडी मारून केवळ आमदारांचाच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य जनतेचाही अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी सभापती रवींद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “दांडी मारणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,अन्यथा प्रशासनावरचा जनतेचा विश्वास उडेल,” असा इशारा त्यांनी दिला. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ते सोमवार, दि. ११ मेपासून तासगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.आता प्रशासन या इशाऱ्याची कितपत दखल घेते आणि दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तासगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या