सांगली प्रतिनिधी : भ्रमंती एक्सप्लोरर्स अन ट्रेकर्स, सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहसी ट्रेक मोहिमेत सांगलीच्या रणरागिणींनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईसह आशियातील दुसऱ्या क्रमांकाची खोल व लांब सांधन दरी यशस्वीरित्या सर करत साहसाचा नवा आदर्श निर्माण केला. या थरारक मोहिमेत १४ महिला, ३ विद्यार्थी आणि ७ पुरुष सहभागी झाले होते.
या संपूर्ण मोहिमेतील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे तासगाव येथील निहा परवीन गौस आत्तार हिने वर्षभरापूर्वी तोंडाच्या कर्करोगावर मात केल्यानंतर अत्यंत जिद्द, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा कठीण ट्रेक पूर्ण केला. शारीरिक आणि मानसिक संघर्षावर मात करत त्यांनी कळसुबाई शिखर सर करून उपस्थित सर्वांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला. प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता जगण्याची उमेद आणि साहस जपणाऱ्या त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. “मनात जिद्द असेल तर कोणतेही शिखर अशक्य नाही” हा संदेश त्यांच्या यशातून सर्व सहभागींपर्यंत पोहोचला.
कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे १६४६ मीटर आहे. त्यामुळेच कळसुबाईला “महाराष्ट्राचे एव्हरेस्ट” म्हणून ओळखले जाते.
शनिवार पहाटे २ वाजता आल्हाददायक वातावरणात ट्रेकला सुरुवात करण्यात आली. वाटेत दाट धुके, थंड वारे आणि गारव्याचा अनुभव घेत सर्वांनी मोठ्या उत्साहात कळसुबाई शिखर सर केले. शिखरावर पोहोचताच सहभागींच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. महिलांनी दाखवलेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि साहसामुळे हा ट्रेक विशेष ठरला.
यापूर्वी शनिवारी सकाळी सर्व ट्रेकर्सनी सांधन दरीचा रोमांचकारी अनुभव घेतला. उंच कातळकडे, अरुंद दगडी वाटा आणि निसर्गरम्य दृश्यांनी सर्वांना भुरळ घातली. सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत दोरीच्या सहाय्याने काही अवघड टप्पे पार करण्यात आले. विद्यार्थ्यांनीदेखील अत्यंत धाडसाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेक पूर्ण केला.
या गिर्यारोहण मोहिमेत रागी कुलदीप शितोळे (वय ७), आयुष शशिकांत शिंदे (वय १०) आणि अथर्व काकडे (वय १५) ही शाळकरी मुलेही सहभागी झाली होती.
यावेळी सांगलीतील क्रांती पाटील, सुचेता घुली, अमृता पाटील, भाग्यश्री पाटील, रक्षणदा औताडे, भाग्यश्री काटकर, गौरी पाटील, सुचित्रा कद्दू, शकुंतला सरगर, अदिती पाटील, वैशाली पाटील या महिलांनी तर टी. पी. पाटील, किरण पाटील, पंकज रसाळ, सचिन माने आणि रोहित औताडे यांनी हा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला.
या मोहिमेचे नियोजन व नेतृत्व भ्रमंती एक्सप्लोरर्स अन ट्रेकर्सच्या सदस्यांनी केले. सहभागींसाठी आवश्यक सुरक्षा साहित्य, मार्गदर्शन आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ट्रेकदरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकमुक्त भ्रमंती करण्याचे आवाहन सुदर्शन चोरगे यांनी केले.
या यशस्वी मोहिमेमुळे सहभागींचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात आणखी साहसी उपक्रम राबविण्याचा मानस संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या