प्रतिष्ठा न्यूज
विटा प्रतिनिधी : नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या वतीने विदर्भ आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांसाठी हळद लागवडीच्या सुधारित तंत्रज्ञानावर विशेष मार्गदर्शन अभियान राबविण्यात आले. गेल्या आठ दिवसांत नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये शेतकरी मेळावे घेऊन हळद पिकातून अधिक उत्पादन व जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या अभियानात हळद संशोधन क्षेत्रातील सलग २८ वर्षांचा अनुभव असलेले प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले. हळद लागवडीसाठी योग्य जमीन निवड, माती परीक्षण, दर्जेदार बियाण्यांची निवड, बीजप्रक्रिया, खतांचा संतुलित वापर, जैविक उत्पादनांचा वापर, तणनाशक व्यवस्थापन, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, काढणी, हळद शिजवणे, वाळवणे, प्रतवारी आणि मार्केटिंग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी माहिती दिली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये हळद लागवडीबाबत अद्यापही शेतकऱ्यांमध्ये आवश्यक तांत्रिक ज्ञानाचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः बियाण्यांचा योग्य वापर, शास्त्रीय पद्धतीने लागवड, प्रक्रिया व बाजारपेठ व्यवस्थापन याबाबत जागृतीची मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सात दिवसांत तब्बल १४ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन कार्यक्रमांना मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. कमी वेळात अधिकाधिक उपयुक्त माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी “शास्त्रीय पद्धतीने हळद लागवड केल्यास उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळवणे शक्य आहे,” असे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या