प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ तासगावातील साने गुरुजी नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.तासगाव स्पोर्ट्स तायक्वांदो संघटना व सिटिझन स्पोर्ट्स सांगली जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले होते.मा.खा.संजय काका पाटील व्यक्तिमत्व विकास व उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर या नावाने घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांसोबत शारीरिक व मानसिक विकासाचे व्यापक प्रशिक्षण देण्यात आले.शिबिरात सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम, ॲथलेटिक्स, झुंबा, स्केटिंग, तायक्वांदो, कराटे, कुस्ती, बॉक्सिंग, तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी, सिलंबम फाईट अशा विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच व्यक्तिमत्व विकास,सामूहिक कवायत आणि फिटनेस यावर विशेष भर देण्यात आला.
हे शिबिर दि. २३ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३:३० ते सायं. ७:३० या वेळेत कन्या प्रशाला व चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर येथे पार पडले.शिबिरात सुमारे २६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.समारोप कार्यक्रमाला सौ.ज्योतीकाकी पाटील, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील,माजी नगरसेवक किशोर गायकवाड, नगरसेवक सतीश लिंबळे,नगरसेवक संदीप सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्योतीकाकी पाटील यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करत, अशा मोफत शिबिरांचे दरवर्षी आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.बाहेर मोठ्या शुल्कात होणारे प्रशिक्षण येथे पूर्णतः मोफत दिले गेले, ही बाब विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
समारोपावेळी पारंपरिक सन्मानाऐवजी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक झाड देऊन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला, तसेच सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले. उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी २२ विद्यार्थ्यांना (११ मुलगे व ११ मुली) स्कूल बॅग देऊन गौरव केला.एकूणच, शिस्त, क्रीडाभावना आणि व्यक्तिमत्व विकासाचा संगम साधणाऱ्या या शिबिराने तासगावमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या