सांगली प्रतिनिधी : मुंबई-बेंगळुरू दरम्यान सुरू होणाऱ्या नवीन एक्सप्रेस रेल्वे गाडीला अखेर सांगली रेल्वे स्टेशनवर कमर्शियल (व्यावसायिक) थांबा मंजूर करण्यात आला असून, सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या निर्णयामुळे सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगळुरू नवीन एक्सप्रेसचे वेळापत्रक ९ मे रोजी जाहीर झाले होते. मात्र त्यावेळी सांगली रेल्वे स्टेशनवर या गाडीला केवळ टेक्निकल थांबा देण्यात आल्याने जिल्ह्यात नाराजी व्यक्त होत होती. यानंतर मंचाने आक्रमक भूमिका घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सांगली स्टेशनला कायमस्वरूपी कमर्शियल थांबा मंजूर केला.
या नवीन रेल्वे सेवेमुळे सांगली, मिरज, कोल्हापूर तसेच परिसरातील प्रवाशांना मुंबई आणि बेंगळुरू प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
गाडी क्रमांक १६५५३ बंगळुरू-मुंबई एक्सप्रेस ही गाडी बंगळुरूहून दर मंगळवार व शनिवारी रात्री ८.३० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता सांगली स्टेशनवर येणार आहे. सांगलीहून सकाळी ११.०५ वाजता सुटून रात्री ८.४० वाजता मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक १६५५४ मुंबई-बंगळुरू एक्सप्रेस ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवार व बुधवारी रात्री ११.१५ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता सांगली स्टेशनवर पोहोचेल. सांगलीहून सकाळी ८.२५ वाजता सुटून रात्री १०.३० वाजता बंगळुरूला पोहोचणार आहे.
या गाडीला दोन्ही दिशांनी ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड, हुबळी आणि दावणगिरी येथे थांबा देण्यात आला आहे.
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचतर्फे प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, या गाडीचा जास्तीत जास्त वापर करून तिकीट काढताना सुरुवातीचे स्टेशन ‘सांगली’ नमूद करावे. एजंटमार्फत तिकीट घेताना देखील तिकिटावर ‘सांगली’ स्टेशन असल्याची खात्री करूनच पैसे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच विटा, तासगाव, कवलापूर, बुधगाव, माधवनगर तसेच शिराळा, इस्लामपूर, आष्टा परिसरातील प्रवाशांनी एसटी बसद्वारे सांगली शहरात येऊन रेल्वे स्टेशन गाठावे, असेही मंचाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ही नवीन रेल्वे सेवा २३ मेपासून बंगळुरूहून तर २४ मेपासून मुंबईहून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या