प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव तालुक्यातील वायफळे परिसरात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीने द्राक्षबागांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे उपसभापती सुखदेव पाटील यांनी तत्काळ प्रशासनाकडे पाठपुरावा करत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पुढाकारानंतर कृषी व महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळपासून वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी परिसरात पाहणी करत पंचनाम्यांना सुरुवात केली.
तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडळ अधिकारी नंदकुमार पवार, तलाठी शीतल पाटोळे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी यांनी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यावेळी सुखदेव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत, “शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणार,” असा विश्वास दिला.
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसासोबत गारपीट झाल्याने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या द्राक्षबागांमध्ये काड्या तयार करण्याचे काम सुरू असून त्या गर्भधारणेच्या अवस्थेत आहेत. हा काळ द्राक्षबागांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र गारांच्या तडाख्यामुळे अनेक काड्या जखमी झाल्या असून वेलीवरील पाने फाटली आहेत. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे द्राक्षांच्या काड्या मोडून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असतानाही शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून आपल्या द्राक्षबागा जिवापाड जपल्या होत्या. तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या या द्राक्षबागांनी तासगावच्या द्राक्षांना सातासमुद्रापार ओळख मिळवून दिली आहे. मात्र दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांच्या फटक्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाला आहे.
गारपिटीमुळे द्राक्षबागांसह अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने सर्व नुकसानग्रस्त क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांनी दिली.
यावेळी डोंगरसोनीचे सचिन भोसले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे पंचनामे करून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही सुखदेव पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या