- चंद्रकांत क्षीरसागर -जेष्ठ पत्रकार सांगली.
"काळाचे चक्र कितीही वेगाने फिरले, तरी काही क्षणांचे गंध मात्र मनात कायमचे घर करून राहतात. शाळेच्या त्या भिंती, तो खेळाचा मैदान आणि सुट्टीत एकत्र खाल्लेला तो डबा हे सगळं कुठेतरी धूसर झालं असेल असं वाटतं, पण आज जेव्हा आपण पुन्हा एकत्र आलो आहोत, तेव्हा काळ जणू पन्नास वर्षे मागे सरकला आहे.
आज ५२ वर्षांनंतर, सिटी हायस्कूल, सांगली च्या प्रांगणात जेव्हा "मैत्र ७४" निमित्त आपण एकत्र जमलो आहोत, तेव्हा डोळ्यांसमोर उभी राहतेय ती १९७४ ची शाळा. तीच निरागस मैत्री, तेच जुने चेहरे आणि तोच जिव्हाळा आज अंगावर पडलेल्या सुरकुत्या किंवा पांढरे झालेले केस महत्त्वाचे नाहीत, तर महत्त्वाचे आहेत ते हृदयाच्या एका कोप्रयात जपून ठेवलेले " मैत्रीचे" ते सुवर्णक्षण, जीवाच्या प्रत्येक वळणावर आठवण आपली येत राहील..." या ओळीप्रमाणे, आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात
असलो, तरी आज या मातीने आणि या शाळेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपाची ओळख करून दिली आहे. हे केवळ स्नेहसंमेलन नाही, तर तो आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्वाचा एक हळवा प्रवास आहे.
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी भावगीतातल्या या भावपूर्ण आशयानं सांगलीच्या सिटी हायस्कूल मधील ५१ वर्षांपूर्वीच आमच हृदयविश्व जागं केलं. अक्षरशः खुलविलं. या भावगीतानं आमच्या हृदयाच्या तारा नेहमीच छेडल्या आणि परस्परातील जिव्हाळाही जपला असंच म्हणावं लागेल. सांगली जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या पातळीवर नेहमीच अग्रेसर असलेलं नाव म्हणजे आमचे सिटी हायस्कूल, भव्य इमारत, विस्तीर्ण मैदान, नैसर्गिक वातावरण, आदर्श शिक्षक, गुणवत्ता परिपूर्ण
शिक्षण... आदर्श पिढी घडविणारे विद्यापीठच, सांगली शिक्षण संस्थेने संस्कारांची मूल्ये रूजविली. त्याच
शिक्षण संस्थेची सिटी हायस्कूल आमची शालामाता आणि आम्ही या मातेची लाडकी मुलं. सन १९७४ साली अकरावी म्हणजे जुन्या मॅट्रीकच्या वर्गात वर्गात शिकणारी शाळेच्या त्या बोलक्या भिंती, मैदानावरील
खेळातील खिलाडीवृती, मधल्या सुट्टीत परस्परातील डब्यातील वाटून खाल्लेलं स्नेहभोजन.. तो स्मृतीगंध मनाच्या कण्यात जपूनच आम्ही सर्वजण जगाच्या दुनियेत बाहेर पडलेलो. खूप मोठ्ठी स्वप्न उराशी बाळगून..! आम्ही पुन्हा कधी एकदा एकत्र भेटू शकू का? असा प्रश्न त्यावेळी कधी पडला नाही, पण नंतर वर्षानुवर्षे एकमेकांविषयी ओढ वाढत राहीली. काळ पुढे सरकला, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मातब्बर बनला. शालामातेच्या प्रांगणात पुन्हा एकदा एकत्र जमावं अन् सहभोजन सहजीवनाचा आनंद घेता यावा हीच तीव्र इच्छा गेट टुगेदरची
संस्थाचालकांसह मुख्याध्यापक मधुकर कांबळे, पर्यवेक्षक प्राची गोडबोलेसह कर्मचारी वृंद यांनी स्वागताची तयारी केली. नित्याची सारी कामे बाजूला सारून ५१ वर्षांनी आम्हां ५१ जनांचे शाळेच्या कमानी समोर आगमन झाले. वाद्यांच्या निनादात.. आमच्यावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. शाळेच्या वतीने गुलाबपुष्प व अत्तर लावून स्वागत केले. तत्कालीन एनरॉन प्रकल्पाचे माजी उपाध्यक्ष संजीव खांडेकर, वासुदेव कोल्हटकर, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत क्षीरसागर, शिरीष उकीडवे, हेमंत पाठक, वेदवती कुलकर्णी, श्रीमती भारती वाठारकर, दीपक लेले. या
दिग्गजांचा यात समावेश होता. गेट टुगेदरची संकल्पना प्राची गोडबोले यांचीच. त्यांनी ती शिरीष उकीडवे, हेमंत पाठक, प्रदीप ताम्हणकर, श्रीनिवास दीक्षित यांच्यावर बिंबवली, २ मे रोजी लेझीम खेळण्याचा आनंद उपभोगला. ३ मे रोजी सकाळी ९ वाजता घंटा वाजताच शाळा भरली, मनात ५१ वर्षांपूर्वीच्या आठवणीची दाटून आलेली बहुगर्दी, इतक्यात टेबलावर छडीचा आवाज घुमताच आम्ही भानावर आलो. वर्ग शांत झाला. मुख्याध्यापक मधुकर कांबळे, पुराणीक सर, उदय जोशी सर, सरदेशमुख सर, पी.टी.चे शिक्षक कांबळे यांनी तर ५१ वर्षांपूर्वीच्या आवाजात सावधान अशी ललकारी दिली. एक जुनी आठवण म्हणून पहिल्या बाकावर बसलेल्या चंद्रकांत क्षीरसागर व संजीव खांडेकर यांच्या हातांवर प्रेमाची छडी दिली. सर्व गुरू जनांनी आठवणींना उजाळा दिला.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या