प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव हायस्कूल (चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर) येथील १९८२ च्या दहावी बॅचमधील मित्र-मैत्रिणींचा सेकंड गेट-टुगेदर नवीन महाबळेश्वर परिसरातील काठी टेक गावाजवळील विंडी हिल्स अॅग्रो टुरिझम येथे ११ व १२ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. तब्बल चार दशकांनंतरही मैत्रीतील आपुलकी, जिव्हाळा आणि उत्साह तसूभरही कमी न झाल्याचे या मेळाव्यात दिसून आले.यापूर्वी १३ एप्रिल २०२५ रोजी तासगाव येथे पहिल्या गेट-टुगेदरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा दुसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी २५ मित्र व ६ मैत्रिणींनी सहभाग नोंदवला.शनिवारी दुपारी सर्वजण नियोजित स्थळी दाखल होताच दिलीप जोगळेकर,आणि कुटुंबियांनी सर्वांचे आत्मीयतेने स्वागत केले. ‘ऑक्सिजन व्हॅली’ म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणाने सर्वांना भुरळ घातली.जोगळेकर यांनी स्वतः एलिफंट रॉक्स, डेंजर ड्रॉप, के-टू पॉईंट, वळण बंधारा, व्हॅल्यू पॉईंट, वाघबीळ व देवराई अशी विविध पर्यटनस्थळे दाखवत परिसराची ओळख करून दिली.
निसर्गाच्या सान्निध्यात दडपे पोहे व घरगुती शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेताना सर्वांनी ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेतला.संध्याकाळी आयोजित गाण्यांच्या कार्यक्रमात चंद्रकांत रोहिडा,दिलीप जोगळेकर,चंद्रकांत इंगळे व सरस्वती घारे यांनी गाणी सादर करत रंगत आणली.अनेकांनी वयाचे बंधन विसरून मनमुराद नृत्य करत आनंद लुटला.या ठिकाणी कृषी व निसर्ग पर्यटन, जैवविविधता अभ्यास, गोशाळा व सेंद्रिय खत निर्मिती यांसारख्या उपक्रमांची माहितीही देण्यात आली.दुसऱ्या दिवशी पहाटे साडेसहा वाजता सर्वांनी ट्रेकिंगचा आनंद घेतला.डोंगर चढ-उतार करत सुमारे चार किलोमीटरचा प्रवास करताना दोन ते तीन तास लागले,मात्र सर्वांचा उत्साह कौतुकास्पद होता.नाश्त्यानंतर दुपारचे जेवण आणि निरोप समारंभ भावनिक वातावरणात पार पडला. दिलीप जोगळेकर,अनिरुद्ध जोगळेकर, सौ.संगिता वहिनी,सौ.केतकी फडके व सागर फडके यांनी पाहुणचारात कुठलीही कमी पडू दिली नाही.त्यांच्या आत्मीय वागणुकीने सर्वांच्या मनावर ठसा उमटवला.
“पुन्हा एकदा विंडी हिल्सला भेट देऊया,” असा निर्धार करत दुपारी तीनच्या सुमारास सर्व मित्रमंडळी आपल्या गावी परतली.हा गेट-टुगेदर यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे ॲडमिन माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे,सुरेंद्र (आप्पासाहेब) कुलकर्णी, संजय पैलवान,पत्रकार राहुल कांबळे, चंद्रकांत रोहिडा, रविकिरण पाटील,राजेंद्र कुलकर्णी, राजाभाऊ ढबू, चतुर बागवडे, राजेश शहा, सरस्वती घारे,राजश्री सुर्वे,सुनिता पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.निसर्गाच्या सान्निध्यात शंभर टक्के ऑक्सिजनचा अनुभव देणारे विंडी हिल्स अॅग्रो टुरिझम हे ठिकाण सर्वांच्या मनात घर करून गेले असून, इच्छुकांनी दिलीप काका जोगळेकर व अनिरुद्ध जोगळेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या