सांगली, दि. 22 : बाजारात काही ठिकाणी "पनीर ॲनालॉग" / "चीज अॅनालॉग" हे पदार्थ "पनीर" किंवा "चीज" या नावाने किंवा त्यासारख्या नावाने विकले जात आहेत. जर चीज अॅनालॉगचा वापर करून अन्न पदार्थ तयार केले जात असतील तर त्याची विक्री करताना बिलांवर, तसेच हॉटेलमध्ये अन्न विक्री करताना मेन्यु कार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादी वर तसा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमने अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई घेण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी परिमंडळ – १, अन्न व औषध प्रशासन रा. अ. समुद्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याबाबत दक्ष असून अन्नातील भेसळ व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कटिबध्द आहे. ग्राहकांनी अशा प्रकारची दिशाभूल झाल्यास त्याबाबत तक्रार प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर/ Email- fdasangli@gmail.com वर नोंदवावी असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, अन्न सुरक्षा व मानके (अन्नपदार्थ मानके व अन्नमिश्रित पदार्थ) विनियम, २०११ मधील विनियम २.१.१ नुसार पनीर हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ आहे. याउलट डेअरी अॅनालॉग हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर व इतर घटक वापरून बनविलेला पदार्थ असून तो पनीरसारखा दिसतो पण पनीर नाही. FSSAI च्या मानकांनुसार हा चीज अॅनालॉग या प्रवर्गात मोडतो. काही रेस्टॉरंट/केटरर्स/हॉटेल्स/फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांमध्ये अन्न पदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून त्याबाबत सदर आस्थापनांकडून ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात येत नसल्याकारणाने ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदी :
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम १८ (२) (e) नुसार उपभोक्त्त्यांना ते जे अन्न खातात, त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी अन्न पदार्थातील घटकपदार्थविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा मानके (Labelling and Display Regulation) २०२० मधील chapter ३ मधील नियमन ९ (६) नुसार अन्न व्यावसायिकाने अन्नपदार्थांची ग्राहकांना विक्री करताना, पोषणसंबंधित माहिती आणि / किंवा त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
राज्य परवानाधारक चीज अॅनालॉगचे उत्पादक/पुरवठादार यांना चीज अॅनालॉगचा विक्री/पुरवठा करताना Food Safety and Standards Act, २००६ च्या कलम २३ मधील तरतुदीनुसार अन्न पदार्थांचे पॅकेजिंग व लेबलिंग भ्रामक अथवा दिशाभूल करणारे नसावे व अन्नपदार्थाचे खरे स्वरूप स्पष्टपणे नमूद करणारे असावे. तसेच, Food Safety and Standards (Labelling and Display) Regulations, २०२० (General Labelling Requirements) नुसार विक्री बिलावर डेअरी अॅनालॉग चीज अॅनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्ट फूड विक्रेते या आस्थापना जर चीज अॅनालॉगचा वापर करून अन्न पदार्थ तयार करीत असतील तर त्याची विक्री करताना बिलांवर, तसेच हॉटेलमध्ये अन्न विक्री करताना मेन्यु कार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादिवर सदर अन्न पदार्थाचा स्पष्ट उल्लेख नमूद करणे आवश्यक आहे.
अन्न व्यावसायिकांना निर्देश :
राज्यातील रेस्टॉरंट/केटरर्स/हॉटेल्स/फास्ट फूड विक्रेते/चीज अॅनालॉगचे उत्पादक/पनीरचे उत्पादक/ पुरवठादार यांनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमने अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई घेण्यात येईल.
हॉटेल/रेस्टॉरंट चालकांनी पनीर अॅनालॉग व चीज अॅनालॉग उत्पादकाकडून खरेदी करताना खरेदी बिलावर सदर अन्न पदार्थाचा स्पष्टपणे उल्लेख आहे की नाही याची खात्री करावी. नंतरच सदरचे अन्न पदार्थ खरेदी करावे.
ज्या अन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतला, त्यावेळेस त्यांनी जो मोबाईल/फोन संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्या संपर्क क्रमांकावर प्रशासनाने हॉटेल/रेस्टॉरंट चालकांना पनीर व चीज अॅनालॉग संदर्भाने उपरोक्त नमूद करावयाचे कार्यवाही संदर्भाने सूचना केलेल्या आहेत.
तथापि, ज्या अन्न व्यावसायिकांनी/परवाना धारकांनी अन्न परवाना घेतेवेळेस स्वतःचा Email ID आणि मोबाईल क्रमांक दिलेला नाही व कोणा त्रयस्थ व्यक्तीचा Email ID आणि मोबाईल नंबर दिलेला आहे अशा अन्न व्यावसायिकांना स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत कि त्यांनी तात्काळ त्यांच्या परवाना/नोंदणीमध्ये स्वतःचा Email ID आणि मोबाईल नंबर टाकून घ्यावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रसिद्धीपत्रकाव्दारे देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या