प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:बेंद्री आणि शिवाजीनगर परिसरात अखंड भक्तीची परंपरा जपत श्री माऊली पारायण मंडळाच्या वतीने यंदाही ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.सलग २६ वर्षांची अखंड परंपरा जपत सुरू असलेल्या या आध्यात्मिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.वैकुंठवासी ह.भ.प. प्रकाशभाऊ घोटीकर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या पारायण सोहळ्याची माहिती मंडळाचे व्यवस्थापक मधुकर पाटील यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटेच्या काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होत असून, त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ आणि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, या सोहळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदात्यांच्या सहकार्याने नाष्टा व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भक्तीबरोबरच सेवाभावाचाही सुंदर संगम या पारायणात पाहायला मिळत आहे.या पारायण सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून हनुमंत राठोड, तर सह-व्यवस्थापक म्हणून श्रीकांत साळुंखे जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच ह.भ.प. हरिभाऊ टिंगरे, मधुकर जाधव, विनायक पाटील, शशिकांत जाधव, संजय पाटील आणि संजय शेटे यांची प्रवचने होणार आहेत.तर कीर्तन सेवेत ह.भ.प. हनुमंत राठोड, सचिन लवांडे, नामदेव पाटील, कृष्णा महाराज, उत्तम महाराज, शिवानंद महाराज आणि सतीश झेंडे हे आपल्या कीर्तनातून भाविकांना अध्यात्माचा संदेश देणार आहेत.या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी क्रांती-नवक्रांती ग्रुपसह मधुकर पाटील, महादेव पाटील, विजय आवळे, श्रीकांत पाटील, बाळासो जाधव, बाबासो जाधव, बाळासो पाटील आणि हरी शिंदे हे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.गावातील सामाजिक आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक ठरलेल्या या ज्ञानेश्वरी पारायणामुळे बेंद्री परिसरात सध्या भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या