प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था निर्माण झाली असून, या विभागातील ढिसाळ व्यवस्थापनामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. दत्त माळ येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या या कार्यालयाचे कामकाज अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे हे कार्यालय प्रत्यक्षात सुरू आहे की भूमिगत झाले आहे, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.मोजणी, नकाशे, जुने सातबारा, फेरफार नोंदी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या अपेक्षेने कार्यालयात येतात. मात्र कार्यालयात अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना काम न होता परत जावे लागते. काही कर्मचारी उपस्थित असले तरी जबाबदारी घेण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकण्याचीच भूमिका घेतात,असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.कार्यालयीन वेळ सुरू झाल्यानंतरही अनेकदा टेबल रिकामे दिसतात, तर चौकशी केल्यावर “मोजणीला गेले आहेत”, “बाहेर गेले आहेत”, “शासकीय कामासाठी गेले आहेत” अशी ठरलेली उत्तरे दिली जातात. मात्र प्रत्यक्ष पडताळणी केली असता काही कर्मचारी कार्यालयात आलेच नसल्याचे उघड होत असल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढत आहे.या संपूर्ण प्रकारामुळे कार्यालयावर आयुक्त किंवा जिल्हा अधीक्षक यांपैकी कोणाचेही नियंत्रण उरले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचारी वेळेवर येतात की नाही, हजेरीची तपासणी कोण करतो, अनुपस्थितीची जबाबदारी कोण निश्चित करतो, याबाबत प्रशासनाकडे उत्तर नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना केवळ वारंवार हेलपाटेच मारावे लागत नाहीत, तर आर्थिक आणि मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता तालुकाभरातून जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या