प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :“राजकारण, पक्ष, गट किंवा तट बाजूला ठेवून केवळ गोरगरिबांचे हित डोळ्यासमोर ठेवा आणि जनतेची रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावा,” अशा स्पष्ट शब्दांत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी प्रशासनाला सुनावले. तासगाव पंचायत समितीमध्ये आयोजित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या विशेष आढावा बैठकीत त्यांनी विकासकामांचा सखोल आढावा घेत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.यावेळी बोलताना संजयकाका पाटील म्हणाले की, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्पर समन्वयाने काम केल्यासच सामान्य माणसाचे प्रश्न जलदगतीने सुटू शकतात. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही.कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामांचा आढावा घेत त्यांनी ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमी योजनेतील कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे लवकरात लवकर मिळावीत यासाठीही त्यांनी संबंधित विभागाकडून माहिती घेत ठोस निर्देश दिले.शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत क्षेत्रांवर विशेष भर देताना त्यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक, पालक आणि अनुभवी शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले. तालुकास्तरावर ‘आदर्श शिक्षकांची टीम’ तयार करून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना त्यांनी केली. शाळांच्या इमारतींची कामे निकृष्ट होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कडक ताकीद दिली.आरोग्य विभागाचा आढावा घेताना, तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत औषधे आणि आरोग्य सेवा वेळेत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कृषी विभागाने ऊस आणि द्राक्षाच्या नव्या वाणांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस तासगावचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, उपसभापती सुखदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत भाऊ जमदाडे, पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, महेश पाटील, प्रमोद शेंडगे, ऋषिकेश बिरने, बालिका विजय माने यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
“बैठकीत बसू नका; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जा!”
आढावा बैठकीदरम्यान तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी माळी उपस्थित होते. मात्र, काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची गंभीर दखल घेत संजयकाका पाटील यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत न थांबता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले.
“तुम्ही बैठकीत बसून वेळ घालवू नका; तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घ्या,” असे आदेश देत त्यांनी पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या