प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याबाबत मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या अडचणी अखेर दूर झाल्या असून, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे योजनेची विद्युत समस्या मार्गी लागली आहे. त्यामुळे ताकारी योजना आता पूर्ण क्षमतेने १२ पंपांवर सुरू होणार असून, तासगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावांनाही या आवर्तनात पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दि.२० एप्रिल २०२६ रोजी वारणाली (जि. सांगली) येथील पाटबंधारे कार्यालयात संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीत ताकारी योजनेच्या सध्याच्या आवर्तनाचा आणि पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊन दीड महिना उलटूनही पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.योजनेला आवश्यक तेवढे व्होल्टेज उपलब्ध नसल्याने १२ पंपांपैकी केवळ ८ ते १० पंपच सुरू राहत होते, परिणामी योजनेचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. याचा फटका चिंचणी, मनेराजुरी, उपळावी, मतकुणकी आणि धुळगाव या गावांतील शेतकऱ्यांना बसत होता.या गंभीर परिस्थितीची दखल घेत संजयकाका पाटील यांनी चार दिवसांपूर्वीच महावितरणच्या मुख्य अभियंता कुंभार मॅडम तसेच एस.ई.कांबळे यांच्याशी थेट चर्चा करून ताकारी योजनेसाठी लागणाऱ्या विजेच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्या पाठपुराव्यानंतर महावितरणने मुडशिंगे सब-स्टेशनवरून लोड ट्रान्सफर केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
या तांत्रिक बदलामुळे आजपासून ताकारी योजनेचे सर्व १२ पंप पूर्ण क्षमतेने चालणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदाच्या आवर्तनात शेवटच्या गावांपर्यंत पाणी पोहोचणार असून, आगामी उन्हाळी आवर्तनातही योजनेची क्षमता अबाधित राहणार असल्याचे सांगण्यात आले.संजयकाका पाटील यांनी योजनेबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनाला सतर्क ठेवले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे ताकारी योजनेतील सर्वात मोठी अडचण ठरलेली विद्युत समस्या दूर झाल्याने लाभक्षेत्रातील गावांना आता पूर्ण दाबाने पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.या बैठकीस अधीक्षक अभियंता पाटोळे, ताकारी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता पाटील मॅडम, तसेच विद्युत व सांख्यिकी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या