प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरात सध्या अवैध धंद्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून,हे धंदे प्रशासनाच्या आशिर्वादाने राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, या धंद्यांना आळा घालण्याऐवजी काही पोलिसच ‘हप्ता’ व्यवस्थेत सहभागी असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,शहरात सुरू असलेल्या विविध अवैध व्यवसायांकडून दरमहा ठराविक रकमेची वसुली केली जाते. ही वसुली थेट पोलिसांकडून न करता, खाजगी ‘पंटर’च्या माध्यमातून केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.संबंधित पंटर दर महिन्याला ठराविक वेळेत हप्ता गोळा करून तो पुढे पोहोचवत असल्याची चर्चा आहे.यामध्ये सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, जर एखाद्या व्यावसायिकाने किंवा संबंधित व्यक्तीने वेळेत हप्ता दिला नाही,तर त्यांच्यावर धाड टाकून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, असेही बोलले जात आहे.त्यामुळे भीतीपोटी अनेक जण नाईलाजाने ही ‘हप्ता’ व्यवस्था चालू ठेवत असल्याचे चित्र आहे.शहरात अवैध दारू विक्री,मटका,जुगार,गुटखा विक्री यांसारखे धंदे उघडपणे सुरू असल्याने सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्याच नावावर असे आरोप होत असल्याने पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांमधून आता या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सत्य बाहेर आणावे,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(टीप : वरील प्रकरणाबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या आधारे ही बातमी सादर करण्यात आली आहे.)

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या