तासगाव:तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचे व लोकसंख्येने मोठे असलेल्या सावळज गावासाठी स्वतंत्र,प्रशस्त आणि सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांना निवेदन देत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,सावळज हे तालुक्यातील केवळ मोठेच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही संवेदनशील गाव असून,येथे शिक्षण,आरोग्य,बँकिंग, शासकीय सेवा अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत.गावात मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा, माध्यमिक,ज्युनिअर व पदवी शिक्षणाची सोय,दर्जेदार रुग्णालये, शेती औषध दुकाने,बँका,टपाल सेवा,तलाठी व मंडळ कार्यालय, सेतू केंद्र आणि आठवडी बाजार यांसारख्या सुविधा असल्यामुळे पंचक्रोशीतील हजारो नागरिकांचा दररोज येथे मोठ्या प्रमाणावर वावर असतो.विशेष म्हणजे,दहिवडी, जरंडी,सिद्धेवाडी,बिरणवाडी, अंजनी, वडगाव, गव्हाण, लोकरेवाडी, डोंगरसोनी, बस्तवडे, खुजगाव, वज्र्यचोंडे या परिसरातील नागरिक व विद्यार्थी एस.टी.बसने सावळजमध्ये ये-जा करतात.मात्र, या सर्व प्रवाशांना आजही कोणतेही अधिकृत बसस्थानक नसल्यामुळे सिद्धेश्वर मंदिरासमोर उभारलेल्या तात्पुरत्या पत्राशेडचा आधार घ्यावा लागत आहे.ग्रामपंचायतीने उभारलेले हे पत्राशेड सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून स्वच्छतेचा अभाव आणि अपुरी सुविधा यामुळे ते जवळपास निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून, महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच घटक त्रस्त झाले आहेत.प्रशांत केदार यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, सावळजमध्ये अनेक वर्षांपासून स्वतंत्र बसस्थानकाची मागणी प्रलंबित आहे.यासाठी गावातील पाटबंधारे विभागाच्या शासकीय जागेचा वापर करून मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक बसस्थानक उभारल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल तसेच गावाच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल.दरम्यान, या निवेदनावर शिवसेना माजी तालुका प्रमुख अनिल शिंदे, राज्य उपाध्यक्ष युनूस कोल्हापूरे, निशांत आवळेकर, महिला आघाडी राज्याध्यक्षा प्रमिला गावडे, जिल्हाध्यक्षा विजयाताई माळी, तमा दोडमणी, विजय जाधव आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सावळजच्या वाढत्या गरजा आणि नागरिकांच्या तीव्र होत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 🚨
“मंदिरासमोर थांबते ‘एसटी’; सावळजला बसस्थानक कधी?”
By -
एप्रिल ०७, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या