तासगाव : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची तासगाव तालुक्यात प्रभावी सुरुवात झाली आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून महसूल सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे.या अभियानांतर्गत तासगाव तालुक्यातील सावळज मंडळ स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय,सावळज येथे करण्यात आले आहे.या शिबिरात नागरिकांना एकाच छताखाली विविध महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शिबिरामध्ये लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण करण्यात येणार असून, भूसंपादन प्रकरणांतील त्रुटी दूर करून दप्तर अद्ययावत केले जाणार आहे.सातबाऱ्यातील चुका दुरुस्त करून सुधारित सातबारा देण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल. “जिवंत सातबारा” मोहिमेअंतर्गत वारस नोंदी, अ.पा.क. नोंदी, नजर गहाण यांसारख्या नोंदींबाबत कार्यवाही केली जाणार आहे.यासोबतच डिजिटल सातबाऱ्याच्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती, अकृषक तरतुदींबाबत मार्गदर्शन, ई-मोजणी सेवा, अॅग्री स्टॅक नोंदणी, पीएम किसान योजनेशी संबंधित कामे तसेच तक्रार निवारण या सर्व सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी दिल्या जाणार आहेत.या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे तासगाव तालुक्यातील सर्व नागरिक व शेतकरी बांधवांनी आपल्या मंडळ स्तरावरील शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.या अभियानामुळे महसूल विभागाच्या कामकाजाला गती मिळणार असून, नागरिकांच्या समस्या थेट ठिकाणीच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 🚨
“महसूल प्रश्नांना ऑन-द-स्पॉट उत्तर; तासगावात ‘महाराजस्व समाधान’ शिबिरांची सुरुवात!”
By -
एप्रिल ०७, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या