मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुल, मिरज यांच्या वतीने आयोजित शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर जीवन विद्या मिशन, पुणे येथील चंद्रकांत निंबाळकर यांनी उपस्थितांना अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम बालगंधर्व नाट्यमंदिर, दिंडी वेस, मिरज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात चंद्रकांत निंबाळकर यांनी आनंदी, समाधानी आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवनमूल्ये, नातेसंबंधातील जिव्हाळा, आत्मचिंतन, मानसिक समाधान आणि योग्य विचारसरणी याविषयी अत्यंत सोप्या, सहज आणि परिणामकारक भाषेत विचार मांडले. त्यांच्या मनोगताने उपस्थितांना जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली.
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन, नियोजन व व्यवस्थापन खाडे शैक्षणिक संकुलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने यांच्या सहकार्याने केले.
यावेळी माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे, रसिका खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच जीवन विद्या मिशनचे डॉ. दिलीप पटवर्धन (माजी अध्यक्ष, मुंबई), सुभाष देसाई (मिरज शाखा अध्यक्ष), अश्विनी गडकरी (मिरज शाखा सचिव), ॲड. अण्णासो पुजारी (माजी अध्यक्ष, मिरज शाखा), ज्येष्ठ पत्रकार शाहिन शेख, सुनील दलाल, मारुती बाविकट्टी, चिदानंद होनराव, दिलीप कारंडे तसेच सांगली-मिरजेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत अशा प्रकारच्या सकारात्मक, मूल्याधिष्ठित आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज आहे, अशी भावना व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या