प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव तालुक्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ सिंचन योजनांच्या पाणीपुरवठ्यावरून राजकीय वाद पुन्हा एकदा चिघळला असून, आमदार रोहित पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.पाणी प्रत्यक्षात सुरू असताना आंदोलन करण्याचा प्रकार हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे, असा आरोप त्यांनी केला.ते सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.दोन दिवसांपूर्वी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तालुक्यातील सिंचन योजनांचे आवर्तन रखडल्याच्या निषेधार्थ तासगाव येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले होते. या आंदोलनात त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर नाव न घेता टीका करत ते फक्त सोशल मीडियावर चमकोगिरी करण्यात व्यस्त आहेत,असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत सविस्तर भूमिका मांडली.आमदार रोहित पाटील म्हणाले, सिंचन योजनांतून पाणी सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाचे ठराविक नियम व अटी आहेत आणि त्या नियमानुसारच पाणीपुरवठा सुरू आहे.गतवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पाणी सुरू झाले होते;मात्र यंदा पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता मार्च अखेरीसच पाणी सोडण्यात आले. असे असताना आंदोलन करण्यामागे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश दिसतो.
तासगाव येथे झालेल्या ठिय्या आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले, हे आंदोलन पाण्यासाठी कमी आणि माझ्यावर टीका करण्यासाठी जास्त असल्याचे चित्र दिसते.जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसारच पाणी वाटप सुरू असून प्रशासन त्या पद्धतीने कार्यरत आहे.याचवेळी त्यांनी सिंचन योजनांच्या अंमलबजावणीतील वास्तव मांडत सांगितले की, पाणी मतदारसंघापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्ताधारी गटातील दोन मंत्री आणि एका आमदाराशी चर्चा करावी लागते, प्रसंगी आग्रही भूमिका घ्यावी लागते. अशा वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे अपेक्षित असताना, माजी खासदार मात्र टीका करण्यासाठीच या प्रश्नाचा वापर करत आहेत.या वादावर पुढे भाष्य करताना आ.रोहित पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, यापुढे सिंचन योजनांबाबत त्यांच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही. माझी बांधिलकी मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांशी आहे आणि त्यांच्या हितासाठी मी काम करत राहीन.
दरम्यान, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत असताना, सिंचनाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्रित भूमिका घ्यावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या