प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव तालुक्यातील टेंभू सिंचन योजनेच्या पाणी वाटपावरून संतापाचा ज्वालामुखी उसळला असून,वंचित गावांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकरी नेते जोतिराम जाधव यांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.यावेळी त्यांनी २० मार्च रोजी दोन वेळा तसेच रविवारी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.कॅनॉलचे पाणी वंजारवाडी हद्दीत पोहोचले असतानाही,प्रथम मांजर्डे आणि सावर्डे या गावांना पाणी देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वीच या गावांना पाण्याचे आवर्तन मिळालेले असताना बस्तवडे,खुजगाव आणि वाघापूर या गावांना पाईपलाईन लिकेजमुळे एकदाही पाणी मिळालेले नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“जे गाव आधीच तृप्त आहेत, त्यांनाच पुन्हा पाणी देणे आणि जे तहानलेले आहेत त्यांना वंचित ठेवणे हा कोणता न्याय?” असा थेट सवालत्यांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असताना, प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी “पिके वाळल्यानंतर येणारे पाणी आम्हाला उपयोगाचे नाही,” अशी हताश भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान,जर १ एप्रिल २०२६ पर्यंत बस्तवडे, खुजगाव आणि वाघापूर या गावांना प्राधान्याने पाणी देण्यात आले नाही, तर २ एप्रिलपासून पुंदि पंप हाऊसजवळ आरफळ कॅनॉलमध्ये उतरून सकाळी ११ वाजल्यापासून १४ वे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संबंधित जाधव यांनी दिला आहे.या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून,आता तरी न्याय मिळणार का,असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या