प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. नियमित धुरीकरण आणि औषध फवारणी होत नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. हीच ठिकाणे आता डासांची पैदास केंद्रे बनली असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे अशा बांधकामस्थळांची तातडीने तपासणी करून साचलेले पाणी हटवण्याची मागणी जोर धरत आहे.पालिका हद्दीतील गावठाण भागात सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने उघडी गटारे आणि घाणीचे साम्राज्य कायम आहे. त्यातच सुका-ओला कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी प्रभावी नसल्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.पूर्वी गावठाण भागापुरता मर्यादित असलेला डासांचा त्रास आता शहरी भागातही झपाट्याने वाढला आहे.संध्याकाळी घराबाहेर उभे राहणे किंवा फेरफटका मारणेही कठीण झाले असून नागरिकांना डासांच्या चाव्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान,वाढत्या डासांमुळे ताप,व्हायरल इन्फेक्शनसारख्या आजारांचे प्रमाण वाढू लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवली जाणारी डास अळी नाशक फवारणी आणि धुरीकरण मोहीम सध्या प्रभावीपणे होत नसल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
📦 उपाययोजना तातडीची गरज
डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने तातडीने व्यापक धुरीकरण मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.
बांधकामस्थळी साचलेले पाणी हटवणे
उघड्या गटारांची स्वच्छता
कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन
अडगळीच्या जागांची नियमित सफाई
डास अळी नाशक फवारणी वाढवणे
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, पालिकेने तात्काळ कारवाई करावी, अशी संतप्त मागणी पुढे येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या