प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 1 - तुमच्या अंगी काही विशेष गुण असल्यामुळेच, स्पर्धा परीक्षेतून तुमची वन सेवेसाठी निवड झाली आहे. प्रशिक्षण उत्तमरित्या पूर्ण केल्यानंतर, आता तुम्हाला प्रत्यक्ष वनक्षेत्रात जाऊन काम करायचे आहे. वने, पर्यावरणाच्या क्षेत्रातील विविध समस्यांना शांतपणे, धैर्याने सामोरे जाऊन वनसंपदा, जैवविविधता, विविध परिसंस्था, अधिवास यांचे रक्षण तसेच पर्यावरण रक्षण यासंबंधीचे महत्त्वाचे काम करा, अशा शब्दांत मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर श्रीलक्ष्मी ए. यांनी प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा दिल्या. कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या चौथ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जयरामेगौडा आर., सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते, प्रबोधिनीचे संचालक शतानिक भागवत, प्राध्यापक (प्रशासन व व्यवस्थापन) एच. एस. वाघमोडे, अपर संचालक (प्रशिक्षण) भरत शिंदे, सामाजिक वनीकरण, सांगलीचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, सहयोगी प्राध्यापक रमेश लिधडे, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरचीचे उपप्राचार्य सुनील शेटे, लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगावचे प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव, सहायक वनसंरक्षक तथा प्रशिक्षण निदेशक बाळकृष्ण हसबनीस व कल्याणी यादव, सत्र संचालक अर्जुन सोनवणे व दत्तात्रय शेटे, वनक्षेत्रपाल सचिन भिसे, सुनील बुल्ले, संतोष साळुंखे, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, सुखदेव खोत, अतिथी व्याख्याते डॉ. के.एन. धुमाळ, सी. ए. कुलकर्णी, इतर अधिकारी व कर्मचारी, वनक्षेत्रपाल व वनसर्वेक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झालेल्या व दि. 29 मार्च 2026 रोजी पूर्ण झालेल्या सहा महिन्यांच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये नागपूर, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, धुळे व नाशिक या वनवृतांतील १९ महिला व ५१ पुरुष अशा एकूण ७० वनरक्षक प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
संचालक शतानिक भागवत यांनी प्रशिक्षणार्थींना वनरक्षणाची शपथ दिली. प्रबोधिनीचे महासंचालक जयरामेगौडा आर. यांनी अहवाल वाचन करताना प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रबोधिनीमध्ये आजवर ४५१ वनरक्षक प्रशिक्षणार्थी, देशाच्या १६ राज्यांतील ४९७ वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी, राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत विविध खात्यांचे ४१ हजार ६४१ अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व प्रशिक्षणार्थी वने, वन्यजीव, नैसर्गिक संसाधने आणि त्यावर अवलंबून असलेल्या जनतेची तन व मनाने सेवा करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निकाल वाचन प्रशिक्षण निदेशक-१ कल्याणी यादव, व सत्र संचालक अर्जुन सोनवणे यांनी केले. प्रशिक्षणार्थीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून, विशाल दगू बेदाडे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू वनरक्षक ठरलेल्या त्यांना तीन रजत पदकेही मिळाली, यश पाटील, प्रदीप भंडारी, शैलेश भावर यांना प्रत्येकी एक रोप्य पदक प्राप्त झाले. क्रीडा स्पर्धेमध्ये, पुरुष गटात धीरज प्रकाश मासी तर महिला गटात सुजाता अर्जुन सोनटक्के हे मॅरेथॉन व मैदानी खेळ विजेते ठरले.
सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. प्रशिक्षणार्थींतर्फ प्रदीप भंडारी, शैलेश भावर व हर्षदा साबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रशिक्षणार्थींच्या शानदार पासिंग आउट परेडसाठी शारीरिक शिक्षण निदेशक संजय घेरडे, विजयानंद गद्रे, सूरज पाटील, किरण इरकर, राहुल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. सांगली पोलीस बँड पथकाचे परेडसाठी विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक बाळकृष्ण हसबनीस यांनी तर आभार प्रदर्शन वनक्षेत्रपाल सुनील बुल्ले यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या