प्रतिष्ठा न्यूज
नाशिक प्रतिनिधी : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून तब्बल 17 दिवसांनंतर विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तथा आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी (ता. 7 एप्रिल) पत्रकार परिषद घेत तपासातील महत्त्वपूर्ण माहिती दिली.सातपुते यांनी सांगितले की, अशोक खरातविरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास SITकडे असून 2 गुन्हे अहिल्यानगर पोलिसांकडे तर 1 गुन्हा नाशिक पोलिसांकडे आहे. SITकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी बहुतेक प्रकरणे लैंगिक शोषणाशी संबंधित असून काही गुन्हे फसवणुकीचे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक खरात हा महिलांना कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची तसेच बदनामीची भीती दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. याशिवाय, पूजाविधी, रुद्राक्ष, खडे आदींच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवत लोकांकडून पैसे उकळल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या 24 पथकांमार्फत सुरू असून सायबर टीमने मोठी कारवाई केली आहे. आत्तापर्यंत तब्बल 4650 आक्षेपार्ह लिंक्स हटवण्यात आल्या असून सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या 451 खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. तसेच पीडितांचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत 30 महिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून अधिक पीडित महिलांनी पुढे येण्यास सुरुवात केली आहे. आरोपीच्या मालमत्तेबाबतचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि SIT संयुक्तपणे करणार असल्याची माहितीही सातपुते यांनी दिली. पुढील 40 ते 45 दिवसांत प्रमुख गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या