तासगाव : उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे मतदारसंघात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोढे तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची बैठक कौलगे येथे पार पडली. कौलगे, लोढे, आरवडे, डोर्ली, सावर्डे या गावांतील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ५ एप्रिल ) रोजी झालेल्या या बैठकीत पुणदी उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचे पुढील नियोजन निश्चित करण्यात आले असून लोढे तलावात लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.
सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना शेती पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः द्राक्षबागांसाठी पाण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या परिस्थितीची दखल घेत आमदार रोहित पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत कौलगे, लोढे, आरवडे, डोर्ली, सावर्डे यांसह मनेराजुरी आणि गव्हाण परिसरात तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडताना द्राक्षबागांची खरड छाटणी पूर्ण झाली असून पुढील काडी तयार करण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. यावर प्रतिसाद देताना आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे. कोणीही चिंतेत राहू नये, नियोजनबद्ध पद्धतीने लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले.
याचबरोबर टेंभू योजनेच्या माध्यमातून सावळज पूर्व भागातील शेतीसाठीही पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासकीय स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातही सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच सावळज परिसरातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीस तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांच्यासह कौलगे, लोढे, आरवडे, डोर्ली, सावर्डे, मनेराजुरी आदी गावांतील पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, पाणीटंचाईच्या कठीण परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून जलव्यवस्थापनाचे नियोजन वेगाने पुढे सरकत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले असून, शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या