तासगाव : चिंचणी येथील लोढे तलावावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये सध्या पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून, द्राक्ष बागा आणि ऊस पिके वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, बाधित गावांतील शेतकऱ्यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांची भेट घेऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत संजयकाका पाटील यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य मांडले आणि तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज सांगली पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ताकारी, आरफळ व लोढे तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पुनदी उपसा सिंचन योजनेचे दोन पंप तातडीने सुरू करून लोढे तलावात पाणी सोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, सद्यस्थितीत पिण्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने उपसा बंदीची अट शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ताकारी योजनेच्या कालव्याचा प्रवाह वाढवून पुनदी, चिंचणी, मटकुणकी, उपळावी आणि मनेराजुरी या सर्व गावांना एकाच वेळी पाणी मिळेल, असे नियोजन करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. ताकारीचे पाणी सध्या येरळा नदीत सोडण्यात आले असून ते नागावपर्यंत पोहोचणार आहे.
दुसरीकडे, टेंभू योजनेतून आणखी एक जादा पंप सुरू करून अग्रणी नदी पात्रातून सिद्धेवाडी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे पाणी लवकरात लवकर बसवेश्वरवाडीपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार म्हैसाळ योजनेचे पाणी १५ तारखेला अग्रणी नदीपात्रात सोडण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब, कार्यकारी अभियंता डवरी साहेब, यादव साहेब, हरुगडे साहेब, प्रज्ञा पाटील मॅडम यांच्यासह लाभधारक क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निर्णयामुळे दुष्काळी भागातील द्राक्ष बागायतदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या