प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बनावट दारू, मटका, जुगार, गुटखा,गांजा विक्री तसेच अवैध गौण खनिज उत्खनन यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांनी अक्षरशः मुळं घट्ट रोवली आहेत. या सर्वांमागे कोट्यवधींचे अर्थकारण दडले असून, जबाबदार यंत्रणांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे हे अवैध उद्योग बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.विशेष म्हणजे, संबंधित यंत्रणांकडून अधूनमधून होणारी कारवाई ही केवळ दिखाऊ असल्याचे बोलले जात आहे. किरकोळ लोकांवर कारवाई करून प्रशासन आपली जबाबदारी पूर्ण केल्याचे दाखवते,मात्र या धंद्यांचे सूत्रधार असलेले ‘बडे धेंडे’ मात्र आजही मोकाट फिरत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तालुक्यात दारूबरोबरच जुगार, मटका, ऑनलाईन लॉटरी आणि मनोरंजनाच्या नावाखाली चालणारे ऑनलाईन गेम्स हे धंदे खुलेआम सुरू आहेत.या माध्यमातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे समोर येत आहे.पोलिसांकडून अधूनमधून किरकोळ कारवाई केली जाते,मात्र काही दिवसांतच “ये रे माझ्या मागल्या”प्रमाणे हे धंदे पुन्हा जोमात सुरू होतात.यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,अनेक अवैध धंदे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे “हे धंदे पोलिसांना दिसत नाहीत का?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असतानाही शहरातील पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विकला जात आहे. अन्न व औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. बंदी असताना हा गुटखा शहरात पोहोचतोच कसा, याचे उत्तर मात्र कुणाकडेही नाही.माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर काही काळासाठी कारवाईचा दिखावा केला जातो, मात्र त्यानंतर पुन्हा सर्व काही पूर्ववत सुरू होते. यामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जोपर्यंत प्रशासन आणि पोलिस यंत्रणा ठोस, नियोजनबद्ध आणि कठोर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत हे अवैध धंदे थांबणार नाहीत, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
📦 नागरिकांचा थेट सवाल
बड्या धेंड्यांवर कारवाई कधी होणार?
गुटखा बंदी असूनही बाजारात कसा?
पोलिस स्टेशनजवळचे धंदे ‘दिसत’ का नाहीत?
कोट्यवधींचा काळा पैसा कुणाच्या संरक्षणाखाली?
अवैध धंद्यांनी शहराला विळखा घातला असून, आता तरी प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या