प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :गतवर्षी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेचा थेट परिणाम दिसून येत असून, आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आरफळ सिंचन योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २०२६ च्या सरकारी दरानुसार भरघोस भूसंपादन मोबदला मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
आरफळ प्रकल्पग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण या महिन्याअखेरपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. या आधुनिक पद्धतीमुळे भूसंपादनाची अचूक मोजणी होणार असून, त्यानंतर तातडीने मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि न्याय्य मोबदला मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.विशेष म्हणजे, २००९ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
गतवर्षीच्या पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लक्षवेधी सूचना मांडत हा मुद्दा ठामपणे उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करत हा विषय प्राधान्याने निकाली काढण्यासाठी दबाव कायम ठेवला. त्यांच्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आता शेतकऱ्यांना सुधारित २०२६ दरानुसार भरघोस मोबदला मिळणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोबदल्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान,आमदार रोहित पाटील यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे आणि लक्षवेधीच्या जोरावर प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या