प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरलेला बस्तवडे फाटा ते बलगवडे हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. आमदार रोहित पाटील यांच्या ठोस आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामाला येत्या शुक्रवारपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सांगली जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्ड्यांनी भरलेला मार्ग, उडणारी धूळ आणि पावसाळ्यात होणारा चिखल यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा अपघाताचा धोका निर्माण होत असल्याने या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांनी विषयाची गंभीर दखल घेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावली. बैठकीत त्यांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडत, कोणत्याही परिस्थितीत रस्त्याचे काम तातडीने सुरू झालेच पाहिजे, असा स्पष्ट आदेशात्मक सूर लावला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनालाही तातडीने निर्णय घ्यावा लागला.बैठकीदरम्यान बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराला कडक शब्दांत सूचना देण्यात आल्या. “शुक्रवारपासून काम सुरू झालेच पाहिजे, अन्यथा जबाबदारी निश्चित केली जाईल,” असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले.
दरम्यान, या कामात काही ठराविक व्यक्तींनी अडथळे निर्माण केल्याची बाबही समोर आली होती. त्यामुळे ठेकेदाराकडून कामात टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट झाले. यावर आमदार पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “गरज पडल्यास मी स्वतः कामाच्या ठिकाणी उभा राहून काम सुरू करून घेईन,” असा थेट इशाराच दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि ठेकेदार या दोघांनाही स्पष्ट संदेश मिळाला.या निर्णयामुळे बस्तवडे ते बलगवडे मार्गावरील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा रस्ता प्रत्यक्षात कामाला लागणार असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.एकूणच, आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठाम भूमिका आणि प्रभावी हस्तक्षेपामुळेच हा रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता शुक्रवारपासून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने, या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या