प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तासगाव शहराच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय मानल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित बायपास प्रकल्पाला अखेर प्रत्यक्ष गती मिळाली असून, या प्रकल्पाच्या भूमी संपादन प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बाधित शेतकरी बांधवांना नुकसानभरपाईच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. कवठेमहांकाळ नगरपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बायपास प्रकल्पाच्या कामाला आता नवी दिशा मिळाली आहे.या कार्यक्रमास माजी खासदार संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत राज्य शासनाकडून तब्बल ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, त्यामुळे प्रकल्पाला प्रशासनिक आणि आर्थिक बळ मिळाले आहे.
तासगाव शहराचा वाढता विस्तार, मुख्य बाजारपेठेतून होणारी अवजड वाहनांची वर्दळ आणि दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली वाहतूक कोंडी यामुळे बायपासची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत होता. मात्र आता बायपास मार्ग सुरू झाल्यानंतर जड वाहतूक शहराबाहेर वळवली जाणार असून, शहरातील रस्ते अधिक मोकळे आणि सुरक्षित होणार आहेत.या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान राखत पारदर्शक पद्धतीने भूमी संपादन प्रक्रिया राबवली जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. नुकसानभरपाईचे धनादेश मिळाल्यानंतर अनेक शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त करत प्रकल्पाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
धनादेश स्वीकारणाऱ्या लाभार्थींमध्ये सौ.सुजाता विलास हिरुगडे आणि सचिन शंकर माळी यांचा समावेश होता. यावेळी दिनकर भोसले,अविनाश पाटील,भरत माळी, सतीश कोकणे,मनोज पाटील,दत्तात्रय कदम,संजय माळी,नामदेव कदम,विलास हिरुगडे,अरुण देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाला नगराध्यक्ष विजया बाबासो पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, माजी नगराध्यक्ष बाबासो पाटील, गटनेते सतीश लिंबळे, नगरसेवक मधुकर पाटील, विशाल शिंदे, संदीप सावंत, संतोष बेले, सचिन भाट महाराज,नगरसेविका दिपाली पाटील, भारती धाबुगडे तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी प्रभाकर पाटील म्हणाले,"तासगावच्या जनतेला दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. हा बायपास केवळ रस्ता नसून शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा नवा मार्ग आहे. ८५ कोटींचा निधी हा फक्त आकडा नसून तासगावच्या भविष्याची मोठी गुंतवणूक आहे.संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
भूमी संपादन प्रक्रियेला सुरुवात झाल्याने तासगावकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आले असून, तासगावच्या विकासाच्या इतिहासात हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या