प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरासह परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी सुविधा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली असून, तासगाव येथील लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली आहे. यासोबतच मोफत डोळे तपासणी पंधरवडा शिबिराचाही शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील रुग्णांना आता उपचारासाठी बाहेरगावी धावपळ करावी लागणार नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या सुसज्ज डायलिसिस विभागाचे उद्घाटन पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरचीचे प्राचार्य धीरज पाटील, तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, नगरसेवक विशाल शिंदे, अभिषेक देशिंगकर आणि डॉ. सायली दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना धीरज पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाची आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून लाईफकेअर हॉस्पिटलने रुग्णांसाठी मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.ते पुढे म्हणाले की, डायलिसिससाठी अनेक रुग्णांना सांगली, कोल्हापूर किंवा मिरज येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास या तिन्ही गोष्टींचा मोठा भार रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांवर पडत होता. मात्र आता ही अत्याधुनिक सुविधा तासगावमध्येच उपलब्ध झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
नगराध्यक्षा विजया पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “रुग्णसेवेच्या माध्यमातून तासगाव हे जिल्ह्याचे आरोग्य केंद्र म्हणून विकसित व्हावे. लाईफकेअर हॉस्पिटलने अल्पावधीतच विश्वासार्ह सेवा देत शहराचा मानबिंदू निर्माण केला आहे. हॉस्पिटलच्या पुढील विस्तारासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”यावेळी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, नगरसेवक विशाल शिंदे आणि अभिषेक देशिंगकर यांनीही रुग्णसेवेतील या नव्या उपक्रमाचे स्वागत करत हॉस्पिटलच्या कार्याचे कौतुक केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर यांनी केले. आभार डॉ. विजय माने यांनी मानले, तर सूत्रसंचालन सौ. श्रद्धा खराडे यांनी केले.या कार्यक्रमास डॉ. सुधाकर अलमद, डॉ. अनिकेत हजारे, शिवाजी माळी, डॉ. प्रताप घाडगे, डॉ. संदेश पाटील, ज्ञानेश्वर कोठाळे, संजय तुपे, प्रसाद नलावडे, काजल शिंदे, वीरकर, रूपाली पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तासगावसारख्या शहरात मोफत डायलिसिससारखी महत्त्वाची सुविधा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील अनेक रुग्णांसाठी हे हॉस्पिटल आता खऱ्या अर्थाने जीवनदायी केंद्र ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या