तासगाव :डॉल्बी आणि हुल्लडबाजीला पूर्णतः फाटा देत पारंपरिक संस्कृतीचा जागर करून सामाजिक संदेश देणाऱ्या अनोख्या उपक्रमातून यंदा तासगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणूक उत्साहात पार पडली.
यावर्षीच्या जयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे “रमाई शिकली बाराखडी” या प्रभावी आणि प्रेरणादायी घोषवाक्याचा देखावा.शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्रीशक्तीचा संदेश देणाऱ्या या थीमने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या दोन आकर्षक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.एका बैलगाडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर दुसऱ्या बैलगाडीत राजश्री शाहू महाराज यांची प्रतिमा अत्यंत सुंदररीत्या साकारण्यात आली होती.या देखाव्यामुळे मिरवणुकीला ऐतिहासिक आणि सामाजिक विचारांचा संगम लाभला.ही भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत एस.टी. स्टँड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली.यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटक्यांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला.रोषणाईमुळे वातावरणात एक वेगळेच दैदिप्यमान दृश्य निर्माण झाले होते.मिरवणूक स्थळी पोहोचल्यानंतर समाज बांधवांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.अत्यंत शांत,शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात विनम्र अभिवादन करून बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाने केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक जाणीव, शिक्षणाचे महत्त्व आणि परंपरेचा सन्मान यांचा प्रभावी संदेश समाजात पोहोचवला.तासगावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत हा जयंती सोहळा आदर्शवत ठरवला.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या