प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘मानव एकता दिवस’ निमित्त तासगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल २७१ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा जिवंत संदेश दिला. प्रेम, बंधुभाव आणि सेवाभाव यांचा संगम ठरलेल्या या उपक्रमाने शहरात सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.दरवर्षीप्रमाणे २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ संत निरंकारी सत्संग भवन, तासगाव येथे हा उपक्रम श्रद्धा आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात पार पडला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सातारा झोनचे प्रभारी आ. नंदकुमार झांबरेजी तसेच तासगावच्या नगराध्यक्षा सौ. विजया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी संयोजक दत्तात्रय जगतापजी यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी बोलताना निरंकारी मिशनचा “रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको” हा मानवसेवेचा संदेश अधोरेखित करण्यात आला. रक्तदान हे केवळ वैद्यकीय मदत नसून करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगण्यात आले.रक्तदान शिबिरानंतर मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बाबा गुरबचनसिंहजी आणि अन्य बलिदानी संतांच्या जीवनकार्याचा स्मरण करत मानव एकतेचा संदेश दृढ करण्यात आला. या सत्संगासाठी खानापूर, आटपाडी, बिरणवाडी, सावळज, नेवरी, विटा, कडेगाव आणि तासगाव परिसरातील संत महापुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.रक्तसंकलनाची जबाबदारी डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रक्तपेढी, मिरज यांनी पार पाडली. तासगाव शहर आणि तालुक्यातील युवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदानात मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी तासगावचे मुखी आप्पासाहेब कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण उपक्रमाचे नियोजन निरंकारी साधसंगत, युवक आणि सेवादल यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या