प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा परिपाठ घेण्यात आला .परिपाठाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळाले.“महामानव” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टीना मार्टिन मॅडम, प्रशासक रफिक तांबोळी सर ,उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर मॅडम ,समन्वयक अश्विनी येळकर मॅडम आणि शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे, लघुनाटिका सादर करून बाबासाहेबांचे विचार आणि संघर्षमय जीवन जिवंत केले. संविधाननिर्मितीत दिलेल्या त्यांच्या योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टीना मार्टिन मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. आंबेडकरांनी दिलेले “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे मंत्र आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करण्याची शपथ घेतली. शाळेतील सर्व घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा दिवस अधिकच संस्मरणीय केला.
तसेच प्रतिष्ठा फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने दिला जाणारा शिक्षण रत्न' हा पुरस्कार गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाच्या केंब्रिज सीबीएसइ इंटरनॅशनल स्कूलचे मराठी विषयाचे अध्यापक श्री. बसगोंडा कबाडे सर यांना मिळाला त्याबद्दल शाळेने त्यांचा सत्कार केला .
त्याचबरोबर शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील सर, विश्वस्त वीरेंद्र पाटील सर ,समन्वयक सतीश पाटील सर यांनी मुलांना उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच कबाडे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीची बीजे रुजवणारा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या