तासगाव :“तासगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. घंटागाडीशिवाय अन्यत्र कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा नगराध्यक्षा सौ विजया पाटील यांनी काही दिवसांपूर्वी व्यापारी व नागरिकांच्या बैठकीत दिला होता. मात्र त्या इशाऱ्यानंतरही शहरातील कचऱ्याची समस्या कायम असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग वाढतच असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.व्यापारी पेठेसह शहरातील विविध भागांत वाढत्या कचरा कोंडाळ्यांमुळे प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्यानंतर नगराध्यक्षा विजया पाटील यांनी शहरात फिरून प्रत्यक्ष पाहणी केली होती.त्यानंतर पालिकेत व्यापारी आणि नागरिकांची बैठक घेऊन स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.या बैठकीत नागरिकांनी घंटागाडी वेळेत येत नसल्याची, गाडी कमी वेळ थांबत असल्याची तसेच दिवसातून दोन वेळा कचरा संकलन व्हावे,अशी मागणी केली होती.नगराध्यक्षा सौ विजया पाटील व उपनगराध्यक्ष पैलवान यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत योग्य सूचना करून घेतल्या होत्या.बैठकीत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अजूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसून येत नाही.त्यामुळे “फक्त इशारे नकोत, आता प्रत्यक्ष कारवाई करा,” अशी ठाम भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहर स्वच्छतेसाठी बैठका पुरेशा नाहीत; आता पालिकेने कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, अशी भावना तासगावकरांमध्ये व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या