प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : विश्रामबाग तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात एका माकडाने आणि त्याच्या पिल्लाने अक्षरशः हैदोस घालत दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिक आणि वाटसरू यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या ही माकडांची जोडी परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या उपद्रवामुळे स्थानिक व्यापारी चांगलेच त्रस्त झाले आहेत. माकडांकडून नागरिकांच्या हातातील पिशव्या हिसकावणे, दुकानातील मालाचे नुकसान करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
इतकेच नव्हे तर विरोध करणाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन चावा घेण्याचा प्रयत्नही ही माकडे करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.
या पार्श्वभूमीवर माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग तसेच प्राणीप्रेमी संस्थांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप समाधानकारक कारवाई झालेली नाही. माकडांना पकडण्याचे प्रयत्न झाले असल्याचे सांगितले जात असले, तरी ती हाती लागत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून कळते.
दरम्यान, दिवसेंदिवस या माकडांचा आगाऊपणा आणि धीटपणा वाढत असल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही, तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत असून, “अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या