प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तासगाव शहराच्या बहुचर्चित बायपास रस्त्याच्या प्रश्नावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष बाबासाहेब उर्फ खंडू कदम यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत, “ज्यांनी सुरुवातीपासून बायपास प्रकल्पाला खिळ घालण्याचे काम केले, तेच आज श्रेयासाठी पुढे सरसावत आहेत,” असा थेट आरोप केला.
कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, सन २०१२ मध्ये स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांनी तासगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बायपासचा प्रस्ताव पुढे आणला होता.शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प असताना त्यावेळी काही राजकीय मंडळींनीच त्याला विरोध करून अडथळे निर्माण केले. आता मात्र तेच लोक जनतेसमोर विकासाचे चेहरे बनण्याचा प्रयत्न करत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली.“आपण केलेले पाप दुसऱ्याच्या घाटावर धुण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करू नये,” असा परखड इशारा देत कदम म्हणाले की, बायपाससाठी मंजूर झालेल्या ८५ कोटी रुपयांच्या निधीवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. निधी कोणी आणला हा मुद्दा दुय्यम असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळवून देणे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या या प्रक्रियेला गती देण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. ०३०४ हेड अंतर्गत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे आणि मोबदला प्रक्रियेला वेग देणे, या सर्व प्रयत्नांमुळे आता मेअखेरपर्यंत बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे कदम यांनी सांगितले.कदम म्हणाले, “हे सर्व प्रयत्न केवळ राजकारणासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी करण्यात आले. त्यामुळे जनतेला खरे कोण काम करत आहे आणि कोण केवळ श्रेयासाठी धडपडत आहे, हे चांगलेच समजले आहे.”धनगाव पाणीपुरवठा योजनेवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. ही योजना स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली असून, सध्याचे सत्ताधारी केवळ हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा गाजावाजा करून नवीन काम केल्याचा आव आणत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कदम यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. “स्वतःची राजकीय उंची आणि मर्यादा ओळखून वक्तव्य करावे,” असा इशारा देत त्यांनी शहरातील बकाल अवस्थेकडे लक्ष वेधले.“तासगावमध्ये सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा नाहीत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून एका वार्डातील निसटत्या विजयावर फुशारक्या मारण्यात अर्थ नाही; कार्यक्षमतेने काम करून दाखवा,” असा थेट समाचार त्यांनी घेतला.याचबरोबर तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून एमआयडीसी प्रकल्पाला गती देण्याचे काम आमदार रोहित पाटील यांनी केले, असे सांगत त्यांच्या कार्यक्षमतेवर बोलण्याचा नैतिक अधिकार सत्ताधाऱ्यांना नसल्याचेही कदम यांनी ठणकावले.
शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बायपासच्या नावाखाली केवळ राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा शहराच्या बिकट अवस्थेकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी खरे प्रयत्न कोणी केले, हे जनता ओळखून आहे. त्यामुळे आता जनतेला फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.”तासगाव बायपासच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या राजकीय संघर्षामुळे येत्या काळात तालुक्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या