प्रतिष्ठा न्यूज
सावंतवाडी प्रतिनिधी : प्रतिष्ठा फौंडेशन, तासगाव, सांगली यांच्यावतीने प्रा.भाऊसाहेब गोसावी यांच्या इरी इरी फापरी काव्यसंग्रहास राज्यस्तरीय प्रतिष्ठा ग्र॔थरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करणेत आले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाबुराव गुरव, जेष्ठ पत्रकार वसंत भोसले, नाट्यप्रेमी कलाकार व लेखक डॉ. दयानंद नाईक, राष्ट्रपती पदक विजेते लोकप्रिय शाहीर बजरंग आंबी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजीराव जाधव यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करणेत आला. कवीवर्य प्रा गोसावी हे सावंतवाडी कारिवडे गावचे रहिवाशी असून त्यांनी आजवर समाजपरिवर्तन करणारे साहित्य लिहिले आहे. भूक, मालवणी मुलुखातीची कविता, तोफा आणि सलामी, इरी इरी फापरी हे त्यांचे कवितासंग्रह, माणुसकिच्या हाकेवरचा गाव हा कथासंग्रह, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी स्त्रीलोकगीते हा लोकसाहित्य संकलन व संशोधनाचा ग्रंथ, जागवा मनाचा जागर हे पथनाट्य, धरणाखालचं गाव हा एकांकिकासंग्रह असा त्यांचा लेखनप्रपंच आहे.
पाठ्यपुस्तक संपादन आणि समीक्षा लेखनही त्यांनी लिहिले आहे. आकाशवाणीवरील कथा, काव्य सादरीकरण, शैक्षणिक संस्थात विविध व्याख्याने आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.
इरी इरी फापरी हा मालवणी काव्यसंग्रह कोकणातील बदलत्या शेतकरी जीवनाचे व शेताभातातील सध्याच्या दुरावस्थ स्थितिचे चित्रण करणारा आहे. आज गावचा विकास होत आहे पण कोकणातील शेतकरी शेतीपासून दूर चालला आहे. हत्ती, गवे, माकडे शेती, बागायतीचे अतोनात नुकसान करत आहेत. कोकणातील शेतजमनीचे आज बरेच प्रश्न समोर येत आहेत. शेतीचे बरेच दावे निकालाविना तहसील, प्रांत, कोर्टात अडून आहेत. शेतजमीनी विकल्या जात आहेत. परप्रांतीय येत आहेत. ते कोकणातील भूखंड विकत घे आहेत. शेतक-याची फसवणुक होत आहे, ही इरी इरी फापरी थांबली पाहिजे. शेतक-यांनी पुन्हा शेतीकडे वळायला पाहिजे अशा आशयाची ही कविता कोकणातील वास्तव जीवन रेखाटत समाजाला प्रबोधनाचा नवा संदेश देत आहे.
प्रा.भाऊसाहेब गोसावी यांच्या साहित्याला आजवर अनेक पुरस्कार प्राप्त असून नव्या उमेदीने लिहिणा-या या लेखकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या