प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:नागपूर येथील देशातील अग्रगण्य पर्यावरण संशोधन संस्था सीएसआयआर-एनईईआरआयमध्ये नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या विकासासाठी वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन स्वीकारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर आमदार रोहित आर.आर.पाटील यांनी ही माहिती दिली.मतदारसंघाचा विकास सुरुवातीपासूनच शास्त्रीय पद्धतीने आणि पर्यावरणाचा समतोल राखत व्हावा,यासाठी या बैठकीत सखोल चर्चा झाली. भविष्यातील विकास आराखड्यात नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, पर्यावरण संवर्धन आणि औद्योगिक वाढ यामध्ये संतुलन साधण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.आमदार रोहित पाटील म्हणाले की, मतदारसंघात नुकतीच मंजूर झालेली एमआयडीसी ही औद्योगिक प्रगतीसाठी मोठी संधी आहे.मात्र,हा विकास पर्यावरणपूरक असावा यासाठी ग्रीन इंडस्ट्रीज उभारण्यावर भर दिला जात आहे.यावेळी वाऱ्याचे प्रवाह,पाण्याची उपलब्धता, जमिनीची गुणवत्ता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा संतुलित वापर यावर तज्ज्ञ शास्त्रज्ञांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.औद्योगिक विकासासोबतच पर्यावरणाचे रक्षण करत रोजगार निर्मिती साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विशेषतः द्राक्ष शेती हा परिसराचा कणा असल्याने बदलत्या हवामानाचा त्यावर होणारा परिणाम गंभीर आहे.यावर उपाय म्हणून द्राक्ष शेती आणि हवामान बदल यासंदर्भात केंद्र सरकारच्या स्तरावर सविस्तर अहवाल तयार करण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.या अहवालाच्या आधारे शास्त्रीय उपाययोजना आणि दीर्घकालीन धोरणात्मक निर्णय घेता येतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.याशिवाय तासगाव येथे प्रस्तावित स्किल डेव्हलपमेंट सेंटर संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण,उद्योगाभिमुख मार्गदर्शन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.ग्रामीण युवकांना सक्षम बनवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
“अग्रणी-कापुरहोळ नद्यांचे पुनर्जीवन शास्त्रीय पद्धतीने”
तासगाव परिसरातील अग्रणी आणि कापुरहोळ नद्यांच्या पुनर्जीवनासाठी शास्त्रीय अभ्यास करून ठोस प्रस्ताव तयार करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.जलस्रोतांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले.शेती,पाणी आणि पर्यावरण या तिन्ही घटकांचा समन्वय साधल्याशिवाय विकास शक्य नाही.त्यामुळे या क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय तज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखालीच घेतले जावेत, असे आमदार रोहित पाटील यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या