प्रतिष्ठा न्यूज
मिरज, दि. ६ : भावी पिढीतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, आणि बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज जीपीएमटीच्या बी.एड प्रशिक्षणार्थींसाठी जिल्हास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे जे आयोजन केले आहे. यावरून असे लक्षात येते की, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून क्रीडा कौशल्य रुजवणारे भावी शिक्षक संस्था घडवत आहे. असे प्रतिपादन चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगलीचे शारीरिक संचालक डॉ. गणेश सिंहासने यांनी केले. ते गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, मिरज. व अग्रणी महाविद्यालय अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सध्याचा विद्यार्थ्या मोबाईल व इतर करमणुकीच्या साधनांमुळे मैदानी खेळ आणि स्पर्धांपासून दुरावला आहे. पण प्रथमतः च गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, मिरज. या महाविद्यालयाने जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींसाठी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ज्यामध्ये 100 मीटर धावणे, थाळीफेक व गोळा फेक अशा स्पर्धांचे नेटके व शिस्तबद्ध आयोजन केले आहे. ते भावी शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. असे डॉ. गणेश सिंहासने यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात क्रीडा मैदानाचे पूजन करून 100 मीटर धावणे मुले या स्पर्धेची सुरुवात झाली. त्यांची उपस्थिती मैदानावरील विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थी स्पर्धकांना प्रेरणादायी, उत्साही आणि प्रोत्साहन देणारी ठरली. या जिल्हास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र अग्रणी महाविद्यालये गुलाबराव पाटील बी.एड.कॉलेज, मिरज. श्रीमती पुतळाबेन शहा बी.एड.कॉलेज, सांगली. सौ मालतीदेवी वसंतराव पाटील बी.एड.कॉलेज, मिरज. श्री अण्णासाहेब डांगे बी.एड.कॉलेज, आष्टा. श्री आप्पासाहेब बिरनाळे बी.एड.कॉलेज, सांगली. इत्यादी बी.एड कॉलेजमधून बहुसंख्य स्पर्धक प्रशिक्षणार्थींनी उत्साहाने सहभाग घेतला आणि भरघोस यश संपादन केले.
दुपारच्या सत्रात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज मुख्याध्यापिका ख्रिस्टीना मार्टिन व गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, मिरजचे प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख अतिथींनी वरील स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या प्रशिक्षणार्थींना शिल्ड, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. आणि भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे यांनी प्रशिक्षणार्थींच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आणि या भावी शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रीडा कौशल्य कशी विकसित करावीत याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या क्रीडा स्पर्धेमध्ये पंच म्हणून क्रिडाशिक्षक अमोल जाधव, चंद्रशेखर मिरजे, सोमनाथ बलगुडे व दीक्षा पोळ यांनी निपक्षपाती,अचूकपणे कार्य केले. त्यांचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुनील पाटील यांनी विशेष श्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता पाटील तर आभार वेदिका जाधव यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता केरीमाने व सन्मती ढोले यांनी केले. या स्पर्धेमध्ये गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, मिरज. मधील प्रशिक्षणार्थी अनुराधा खामकर थाळीफेक तृतीय व विनायक गडदे थाळी व गोळा फेक तृतीय क्रमांकाचे यश संपादन केल्याबद्दल संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील व कॅम्पस समन्वयक सतीश पाटील यांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी बी.एड.व डी.एड.चे सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या