प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून युवकावर तलवार व कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.सागर सदाशिव पाटील या युवकावर आज (गुरुवार) सकाळी साडेसातच्या सुमारास घरात घुसून हल्ला करण्यात आला. या घटनेत सागर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना जेरबंद केले आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदेश शैलेश कांबळे आणि संजीत अजित सावंत (दोघेही रा. वायफळे, ता. तासगाव) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सागर पाटील आणि संदेश कांबळे यांच्यात मंगळवारी जिल्हा परिषद शाळेजवळ किरकोळ कारणावरून वाद झाला होता.हा वाद वाढत गेला आणि दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद त्या वेळी शांत केला होता.त्यानंतर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतही हालचाली झाल्या होत्या.बुधवारी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.अखेर दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यात नोटरी करून पुढे वाद न करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र,या समझोत्याच्या आड दडलेला राग आज सकाळी उफाळून आला.संदेश कांबळे आणि त्याचा साथीदार संजीत सावंत हे दोघे तलवार आणि कोयता घेऊन सागर पाटील यांच्या तळेवस्तीतील घरी गेले.घरात घुसून त्यांनी सागरवर वार करण्याचा प्रयत्न केला.प्रसंगावधान राखत सागर बाहेर पळाला,मात्र दोघांनी पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार केला. वार चुकवताना कोयता सागरच्या हातावर बसला.
यावेळी सागरचे वडील सदाशिव पाटील हे मुलाला वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला.सागरने आरडाओरडा केल्याने शेजारील महिला व ग्रामस्थ धावत आले.त्यामुळे आरोपींनी दुचाकी तिथेच सोडून पळ काढला.
ग्रामस्थांनी सुमारे २०० लोकांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.दरम्यान,आरोपींनी एका विहिरीत लपून बसत पोलिसांना फोन करून लोकेशन पाठवले.त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले.संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या प्रकाराचा निषेध केला.शेकडो युवक ग्रामपंचायत कार्यालयात जमले होते.यावेळी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले.आरोपींना अटक करण्यात आली असून कठोर कारवाई केली जाईल,असे त्यांनी सांगितले.तसेच पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या