प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:नेहरूनगर येथे घडलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतप्त भावना व्यक्त केल्या. सभेत विशेषतः महिलांनी आक्रमक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच गावातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तात्काळ विशेष ग्रामसभा बोलवावी, अशी मागणी करत सरपंचांना लेखी निवेदनही देण्यात आले.रविवार (दि.८ मार्च) रोजी मध्यरात्री नेहरूनगर येथील प्रकाश ढाणे यांच्या घरावर काही गावगुंडांनी दगडफेक करून घरातील व्यक्तींवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित निषेध सभेत ग्रामस्थांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवत, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. बाहेरगावच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गावात आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय असल्याचेही उपस्थितांनी ठामपणे सांगितले. या घटनेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये, असा इशाराही देण्यात आला.गावातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून गुंडगिरी आणि दहशतीला एकजुटीने उत्तर देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या या संतापजनक प्रकारामुळे गावाची बदनामी झाली असून या घटनेचे खरे सूत्रधार समोर आलेच पाहिजेत,अशा तीव्र प्रतिक्रिया सभेत उमटल्या.
दरम्यान, उपस्थित महिलांनी आक्रमक भूमिका घेत महिला सरपंचांवर नाराजी व्यक्त केली.घटना घडून चार दिवस उलटून गेले तरीही सरपंचांनी साधी विचारपूसही केली नाही,असा आरोप करत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस आणि कठोर निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी मयुर जाधव,अरुण मोकाशी,प्रकाश ढाणे,अरुण माने,प्रदीप मोकाशी,बाळासाहेब पाटील, राजगोंडा पाटील,आप्पासाहेब पाटील,उदय पाटील, रामदास जाधव,आर.डी.पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.सभेला एस.ए. पाटील, सुहास कदम, पोपट चव्हाण, सी. ए. पाटील, ए. के. पाटील, पंडित पाटील, शिवाजी शिंदे, शरद पाटील, सुरेश पाटील, सुर्यकांत भोसले, दिपक भोसले, नवनाथ माने, श्रीकांत कुंभार, गजेंद्र मस्के, चंद्रकांत लोंढे, पोपटराव पाटील, वसंत भोसले, अमित देवकुळे, भारत मोरे, दादा देवकुळे, विलास भोसले, धनंजय शेलार, प्रमोद सुखदेव, सौ. वर्षा ढाणे, वैशाली वाघमारे, संगीता देवकुळे, अर्चना देशमुख, चंपा कांबळे, सुवर्णा जाधव, अंजली ढाणे, वंदना जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या