प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरातील वाढत्या अस्वच्छते विरोधात राष्ट्रीय दलित पँथर सेनेने आक्रमक भूमिका घेत नगरपालिका प्रशासनाला थेट धारेवर धरले. मुख्याधिकारी स्वच्छता ठेकेदाराच्या कारभाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने त्यांच्याच दाराला निवेदन अडकवून निषेध नोंदवला. यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दालनात बसून ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या वारंवारच्या अनुपस्थितीवर संताप व्यक्त केला.
मुख्याधिकारी लेंढवे यांना दिलेल्या निवेदनात प्रशांत केदार व युनूस कोल्हापूरे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता ही नागरिकांची मूलभूत गरज व मानवी हक्कांशी निगडित बाब आहे.मात्र तासगाव नगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांच्या या हक्कांकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.नगरपालिका व स्वच्छता ठेकेदार यांच्यातील करारानुसार सेवा दिली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.शहरात कचरा कुंड्यांची संख्या अत्यल्प असून अनेक कुंड्या मोडकळीस आल्याने कचरा उघड्यावर साचलेला दिसतो.घंटा गाड्यांची संख्या कमी असल्याने घरगुती व व्यावसायिक कचरा उचलण्यास विलंब होत आहे.अनेक वेळा गाड्यांबरोबर कामगार नसल्याने नागरिकांनाच स्वतः कचरा टाकावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.त्यातच कचरा वाहतूक करणाऱ्या घंटा गाड्यांची अवस्था दयनीय असून किरकोळ कारणांनी त्या वारंवार बंद पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात गटारींमध्ये पाणी नसल्याने डासांची उत्पत्ती वाढून डेंगू, मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे.औषध फवारणी अत्यल्प प्रमाणात होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संकट ओढावले आहे.गटार स्वच्छता करणाऱ्या कामगारांना संरक्षणासाठी आवश्यक जॅकेट,हातमोजे,मास्क व सॅनिटायझर यांसारखी साधनेही पुरवली जात नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.पुरुष स्वच्छतागृहांचीही स्वच्छता नसल्याने तीव्र दुर्गंधी येत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.वाढत्या हवा प्रदूषणावरही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.“स्वच्छ भारत” व “माझी वसुंधरा” या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांना तासगाव नगरपालिका प्रशासन व स्वच्छता ठेकेदाराने अक्षरशः “खो” दिल्याची टीका करत करारातील अटींनुसार सर्व स्वच्छता सेवा तातडीने सुधाराव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तासगाव नगरपालिका कार्यालयासमोर ‘कचरा फेक आंदोलन’ करण्यात येईल,असा इशाराही संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार व प्रमिला गावडे यांनी दिला आहे.या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष सचिन भोसले, जिल्हाध्यक्ष विजयाताई माळी, सृष्टी कांबळे, तमा दोडमणी, अंकुश केंगार, अनिल कांबळे, ऋषिकेश गुजले, सागर कोळी व पूर्वेश कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या