प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तासगावचे उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला शक्तीला सलाम केला. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अनमोल असून त्यांच्या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमांतर्गत उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी तासगावच्या नगराध्यक्षा, नगरसेविका,प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी,महिला उद्योजिका तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याचबरोबर अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या महिला डॉक्टर,स्वतःच्या कर्तृत्वाने उद्योगविश्वात नाव कमावणाऱ्या महिला उद्योजिका आणि समाजातील वंचित घटकांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान म्हणाले की,आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.घराच्या उंबरठ्यापासून ते प्रशासकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रापर्यंत महिलांनी मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.तासगाव शहराच्या विकासामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या महिलांचा मोठा वाटा आहे.तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलीस भगिनी आणि आरोग्यसेवा देणाऱ्या महिला डॉक्टरांचे कार्य अत्यंत वंदनीय असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत असून महिला शक्तीचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या