कराड (प्रतिनिधी) : भारताचे थोर सुपुत्र यशवंतराव चव्हाण साहेब यांची जडणघडण कृषीजन व्यवस्थेतून झाली असून या व्यवस्थेतील सर्वसामान्य लोकांचे दारिद्र्य, बेरोजगारी, मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षणाची ज्योत प्रत्येकाच्या चुलीपर्यंत पोहोचविण्याचे अविरत प्रयत्न करणारे नायक व आजही कालसुसंगत असलेल्या आदर्श ज्ञानव्यवहाराचे प्रेरक आहेत, असे प्रतिपादन डॉ. राजन गवस यांनी केले.
ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड अंतर्गत वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त ‘संगम’ व ‘यशवंत’ या नियतकालिकांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ‘यशवंतराव चव्हाण आणि ज्ञानव्यवहार’ या विषयावर बोलत होते. पुढे ते असे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण साहेब यांनी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाबरोबरच विश्वकोश मंडळाची स्थापना, साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना, विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ इत्यादींसाठी आग्रह धरून ते कार्य तडीस नेऊन शिक्षणातून समाजभान असणारा माणूस घडविण्यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा तसेच या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आपण सर्वांनी करावे, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफहुसेन मुल्ला, विश्वस्त व सदस्य मा. श्री. अरुण पाटील (काका), तसेच मा. दिलीप भाऊ चव्हाण, मा. मानसिंगराव पाटील, मा. प्रकाश पाटील बापू, प्राचार्य मा. डॉ. एस. बी. केंगार, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. कालेकर, मा. राजेंद्र माने, प्राचार्य प्रो. डॉ. आर. आर. जाधव, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. आर. सरोदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मा. यशवंतराव चव्हाण साहेब, सौ. वेणूताई चव्हाण आणि आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रो. डॉ. आर. आर. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. जयदीप दीक्षित यांनी करून दिला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘संगम’ व ‘यशवंत’ नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘संगम’ नियतकालिकाचे कार्यकारी संपादक डॉ. एम. एस. शिंदे आणि ‘यशवंत’ नियतकालिकाचे कार्यकारी संपादक प्रा. गिरीश पोतदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. ए. बी. पाटील यांनी लिहिलेले “पर्यावरण संवर्धन आणि स्वयंसेवी संस्था : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तक” व डॉ. जयसिंह ओवाळ यांनी लिहिलेले “भारतीय संविधान आणि लोकशाही : अमृतमहोत्सवी वाटचाल – एक दृष्टिक्षेप” या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रो. डॉ. अंकुश माळी यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. पी. पाटील यांनी केले. याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या