प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये विविध रस्त्यांसह नागरी सुविधांची कामे तातडीने व प्राधान्याने हाती घ्यावीत,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) चे स्विकृत नगरसेवक अॅड. तुकाराम कुंभार यांनी तासगाव नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे निवेदन नगराध्यक्षांना सादर करण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक पाचमधील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना रोजच्या ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे या मार्गांवरून दोन मोठ्या हायस्कूलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींची तसेच बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते.
यामध्ये घिसाडी पूल ते गणपती मंदिर रस्ता,संस्कार मंदिरसमोरील पूर्वेकडून जोशी गल्लीपर्यंतचा रस्ता, वंदे मातरम चौक ते गणपती मंदिर-जोशी गल्ली रस्ता,पोस्ट ऑफिस ते पेट्रोल पंप रस्ता,सुर्यवंशी गल्ली ते गुरुवार पेठ रस्ता ते गायकवाड वाड्या पर्यंतचा रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.तसेच घिसाडी पूलावर मोठी कचरा कुंडी ठेवणे,चतुर्भुज बिल्डिंगच्या पूर्वेस कचरा कुंडी ठेवणे या मागण्याही करण्यात आल्या आहेत.दरम्यान,घिसाडी पूल ते गणपती मंदिर रस्त्यापासून कडबेवाला बोळामध्ये गटारीवरील मोठे होल उघडे असून सुमारे पंधरा दिवसांपूर्वी एका लहान मुलीचा त्यात पडून अपघात झाल्याची घटना घडली आहे.बोळाच्या मध्यभागीच ही होल असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या गटारींवर तात्काळ ब्रेकेट टाकून झाकण बसवावे,अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक पाचमधील वरील सर्व कामे तातडीने व प्राधान्यक्रमाने करून नागरिकांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी अॅड.तुकाराम कुंभार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या