प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा क्र. १ अंतर्गत तासगाव तालुक्यातील येळावी येथे भव्य शिबिर उत्साहात पार पडले. शनिवार (दि. ७ मार्च २०२६) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सांस्कृतिक भवन,येळावी येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.या शिबिरास तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील,येळावी जिल्हा परिषद विभागाचे सदस्य अमित उर्फ विशाल पाटील,पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांच्यासह येळावी मंडळातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी,शेतकरी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध कामे तातडीने मार्गी लावण्यात आली. यामध्ये वारस नोंदी,एकत्र कुटुंब मॅनेजर नोंदी कमी करणे,लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांची नावे सातबारावर सहधारक म्हणून नोंदविणे,सातबारा मधील चुकांची दुरुस्ती,सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचा लाभ,तुकडेबंदी कायदा व जमीन अकृषक करण्याच्या सुधारित तरतुदींविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली.यासोबतच विद्यार्थ्यांना उत्पन्न, जाती व रहिवासी (डोमिसाईल) दाखले वितरित करण्यात आले.रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे,नवीन शिधापत्रिका देणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड तयार करणे अशा सेवाही देण्यात आल्या.कृषी विभागामार्फत मृदा आरोग्य तपासणी कार्डांचे वाटप, तर आरोग्य विभागाकडून आयुष्मान भारत योजनेची कार्डे वितरित करण्यात आली. तसेच पीएम किसान व ऍग्री स्टॅक संदर्भातील नोंदी व त्रुटी दुरुस्तीची कामेही करण्यात आली.या शिबिरात येळावी मंडळातील २१ फेरफार निकाली काढण्यात आले, तर ६०० पेक्षा अधिक डिजिटल सातबारा आणि ३२१ विविध दाखले नागरिकांना देण्यात आले. सेतू केंद्र, अंगणवाडी विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख, रोजगार हमी योजना, आरोग्य विभाग, वन विभाग व उमेद महिला बचत गट आदी विभागांचे माहिती स्टॉलही लावण्यात आले होते.दरम्यान, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांना विविध लाभांचे वितरण केले तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पालक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महसूल सतीश कदम,तहसीलदार तासगाव, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच येळावी मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, कृषी सहाय्यक व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यातील इतर महसुली मंडळांमध्येही शासनाच्या नियोजनानुसार ‘महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सातबारा व महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे शिबिरात पूर्ण करून घ्यावीत,असे आवाहन तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या