प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 20 : क्रीडा धोरणांतर्गत 5 टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्लॉकचेन (Blockchain) तंत्रज्ञानावर आधारित क्रीडा ई-प्रमाण प्रणालीवर खेळाडू व क्रीडा संघटनांच्या नोंदणीचा शासन निर्णय झाला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडुंना शासकीय व निमशासकीय सेवेतील 5 टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद आणि त्रृटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने ब्लॉकचेन (Blockchain) कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करून, पूर्णतः डिजिटल क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
याच्या अंमलबजावणीसाठी क्रीडा संघटनांनी या कार्यप्रणालीची तत्काळ माहिती घ्यावी, अभिलेख जतन अंतर्गत स्पर्धा संपन्न झाल्यापासून 7 दिवसांच्या आत, स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणि गुणपत्रिका या माहितीची फाईल क्रीडा ई-प्रमाण पोर्टल (https://sports.maharashtra.gov.in/) वर अपलोड करण्यासाठी संचालनालयाला सादर करणे संघटनांवर बंधनकारक राहील. ही माहिती संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्याने डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. जी संघटना विहित 7 दिवसांच्या मुदतीत माहिती ब्लॉकचेनवर अपलोड करणार नाही, अशा परिस्थितीत खेळाडुंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संघटनेची राहणार आहे.
खेळाडुंच्या नोंदणी प्रक्रियेंतर्गत खेळाडुंनी क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर आपल्या आधार संलग्न आयडीद्वारे लॉग-इन करून नोंदणी करणे अनिवार्य आहे. खेळाडुंनी सादर केलेली माहिती आणि संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेला अभिलेख (रेकॉर्ड हॅरा) यांची प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी होईल. त्यामुळे खेळाडुंना यापुढे पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात जाण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. तांत्रिक कारणास्तव एखाद्या खेळाडुचे प्रमाणपत्र नामंजूर झाल्यास, तक्रार करण्याची व तक्रारी नंतरही खेळाडूस प्रमाणपत्र न मिळाल्यास 30 दिवसांच्या आत ऑनलाईन अपील करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या