प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगावःआगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर,आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेणारा अधिकृत 'जाहीरनामा' (वचननामा) आमदार रोहित पाटील यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आला.तासगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली.यावेळी सर्व उमेदवार,पक्ष पदाधिकारी,समर्थक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
यावेळी बोलताना निसर्गात जशी वसंताच्या आगमनाने नवनिर्मितीची चाहूल लागते, त्याचप्रमाणे तासगाव कवठे महांकाळ भागाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला आहे. "या जाहीरनाम्यात केवळ आश्वासने नसून,शाश्वत विकासाचा आराखडा मांडण्यात आला आहे," असे प्रतिपादन आमदार रोहित पाटील यांनी केले.नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शहाजीराजे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना अभिवादन करून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.या जाहीरनाम्यात प्रामुख्याने खालील बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे,
१) कृषी व जलसिंचनः दोन्ही तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत जलसिंचन योजनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी सुविधा. अत्याधुनिक मृदा व जल परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करू.
२) पाणीपुरवठा व वीजः प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी आणि शेतीसह उद्योगांसाठी 'अविरत वीजपुरवठा' सुनिश्चित करणे.
३) ग्रामीण पायाभूत सुविधाः गावांना जोडणारे पक्के रस्ते, गटार व्यवस्था आणि ग्रामविकासाचे बळकटीकरण.
४) महिला व बालविकासः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांचे बळकटीकरण आणि अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण
करून बालविकासावर भर.
५) शिक्षण व आरोग्यः जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारणे (डिजिटल क्लासरूम व वर्गखोल्यांची दुरुस्ती) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर्जेदार औषधोपचार व सुविधा उपलब्ध करणे. रुग्णवाहिका सेवेला अजून विस्तार करणार.
६) युवक कल्याणः युवकांच्या सुप्त गुणांना तसेच कौशल्यांना वाव देण्यासाठी तसेच नवीन कौशल्ये शिकवण्यासाठी स्कील सेंटरची उभारणी; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वाचनालये, व्यायामशाळा यांचे जाळे दोघही तालुक्यात विणणार.
७) समाज कल्याण व सामाजिक न्यायः समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना मिशन मोडवर राबविण्याचा निर्धार. योजनांबाबत जनजागृती करून प्रशासकीय अडचणींवर तात्काळ मार्ग काढणार.
विद्येची देवता सरस्वती आणि सावित्रीबाई फुलेंच्या साक्षीने,आम्ही वचन देतो की,हा केवळ कागदी दस्तऐवज नसून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.तासगाव आणि कवठे महांकाळला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि 'सर्वांगीण, सर्वसमावेशी,समतोल व शाश्वत विकास' साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.तरी, जनतेने या विकासाच्या प्रवासात आम्हाला भक्कम साथ द्यावी,असे आवाहन यावेळी आमदार पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या