प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ या बेशिस्त, भ्रष्टाचारी आणि गैरवर्तन करणार्या अधिकार्याची उच्चस्तरीय महिला समितीमार्फत चौकशी करून त्यांना शासकीय सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे सांगली उप जिल्हा प्रमुख प्रदीप माने पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संजय पाटील, शिवराज पाटील, अविनाश सावंत, सुनील वडार, अभिषेक वाघ व शिवसैनिक उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्याबाबत अनेक तक्रारी असून वृत्तपत्रांमधूनही तशा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. सदरचे अधिकारी आरोग्य विभागात विविध स्तरावर कार्यरत महिला अधिकारी व महिला कर्मचार्यांचा मानसिक छळ करत असल्याची चर्चा आहे. ज्या महिला त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत त्यांना विविध प्रकारच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देतात. तरूण महिला कर्मचारी व अधिकार्यांना नादाला लावणारा स्त्रीलंपट अधीकारी असल्याची चर्चा आहे. भ्रष्टाचार आणि इतर अनैतीक कामांचा उकल व्हावा यासाठी याची नार्को चाचणी करण्यात यावी. अनेक महिलांचे संसार या अधिकार्यांमुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. तसेच विविध योजनांमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केल्याची चर्चा आहे. अशा बेशिस्त, भ्रष्टाचारी आणि गैरवर्तन करणार्या अधिकार्याची उच्चस्तरीय महिला समितीमार्फत चौकशी करावी. महिला वैद्यकीय अधिकार्यांच्या सन्मान, मानसिक सुरक्षितता व कार्यस्थळी सुरक्षित वातावरणाशी निगडीत गुन्हा असल्याने संगली जिल्ह्याची राज्यभर बदनामी होत आहे. त्यामुळे डॉ. विजयकुमार वाघ यांना नोकरीतून कायमचे बडतर्फ करावे. तसेच कडक कारवाई करण्यात यावी. सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास सांगली जिल्हा परिषद समोर शिवसेना स्टाईलने अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासून उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला असून निवेदनात विविध मागण्या केल्या आहेत. त्या अशा
१) डॉ.नम्रता तळेकर, वैद्यकीय अधिकारी गट-अ, प्राथमिक आरोग्य केंद्र उमदी यांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय महिला समितीमार्फत चौकशी करण्यात यावी.
२) डॉ. विजयकुमार वाघ यांनी शासकीय सेवेत असणार्या महिलांशी केलेले वॉटस् चॅटींग तसेच त्यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावेत. जेणेकरून हा अधिकारी स्त्रीलंपट असल्याचे स्पष्ट होईल.
३) महिला कर्मचार्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता व न्याय मिळणे हा प्रशासनाचा नैतिक तसेच संवैधानिक दायित्वाचा भाग असल्याने, या प्रकरणात आपण तातडीने योग्य आदेश निर्गमित करावेत.
४) डॉ. विजयकुमार वाघ यांची महिला आयोगा मार्फतही चौकशी करण्यात यावी.
५) डॉ. विजयकुमार वाघ यांची नार्को चाचणी करण्यात यावी ज्यामुळे कथीत भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होतील. तसेच अशा प्रकरणात अन्य सहभागींची नावे उघड होतील.
६) काही महिलांचे पगार प्रलंबीत ठेवल्याची चर्चा असून ते का ठेवली आहेत याची चौकशी व्हावी.
७) रूग्णवाहिकेच्या चालकांचे पगार प्रलंबीत असून अद्याप नवीन निवीदा काढण्यात आलेल्या नाहीत. यामध्ये त्यांचा वैयक्ति काय स्वार्थ आहे. यादृष्टीने चौकशी व्हावी.
८) उपकेंद्राच्या सीएचओकडून दर महिन्याला पगार काढण्यास ५०० रुपये वर्गणी जमा करून जिल्हा स्तरावर देतात अशी चर्चा आहे. सांगली जिल्ह्यात ३०० च्या वर उपकेंद्र आहेत. याची चौकशी व्हावी.
९) अनेक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्णवेळ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी जागा रिक्त आहेत. अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा ऑर्डर घ्यावी लागते. पुनर्नियुक्तीसाठी एक महिन्याचा पगार बंद पाकिटात घालून सांगली ऑफिसला द्यावा लागतो. अशीही चर्चा आहे. बंद पाकीट दिले तरच पुनर्नियुक्ती मिळते अन्यथा त्यांना ताटकळत ठेवले जाते. याची चौकशी व्हावी.
१०) प्राथमिक आरोग्यकेंद्रात औषध उपचार मिळत नाहीत. औषधे संपल्यानंतर जिल्हा परिषदेकडून वेळेत औषध पुरवठा होत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ ही औषधे कुठे पाठवितात यामागे काळा बाजार होत असावा अशी चर्चा आहे.
११) मानसिक छळ, पगार रोखणे, बदनामी. एवढ्यावर न थांबता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तक्रार आहे, छापा पडणार आहे, अशा खोट्या धमक्या अनेक महिलांना डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिलेल्या आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी.
१२) वेबसाईट डोंगल खरेदीबाबतचा झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी.
१३) डॉ. विजयकुमार वाघ यांच्या कार्यकाळा झालेल्या सर्व खरेदी प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी.
१४) गौरवशाली परंपरा लाभलेल्या सांगली जिल्हा परीषदेत लागलेली भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा भ्रष्ट अधिकार्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे.
१५) बांधकाम विभागातील कंत्राटदारांकडून टक्केवारी घेण्यात येते अशी चर्चा असून टक्केवारी मुक्त जिल्हा परिषद व्हावी.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या