प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने तासगांव तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून,निवडणूक शिस्तबद्ध,पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे यांनी दिली आहे.
या निवडणुकीसाठी तासगांव तालुक्यात एकूण 1,89,614 मतदार असून, यामध्ये 96,621 पुरुष, 92,988 महिला व 5 इतर मतदारांचा समावेश आहे.तासगांव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण 6 गट व 12 गण असून,त्यासाठी 201 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.सर्व मतदारांना निर्भय वातावरणात व सुलभपणे मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय उपाययोजना करण्यात आल्या आहेत.निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 1,472 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मतदान अधिकारी,सहाय्यक मतदान अधिकारी,शिपाई,पोलीस कर्मचारी व बीएलओ यांचा समावेश असून,10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी व आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये स्थिर सर्व्हेक्षण पथक (SST – दिवस व रात्र) 4, भरारी पथक (FST – दिवस व रात्र) 4, व्हिडीओ सर्व्हेलन्स पथक (VST) 3 व व्हिडीओ व्हीव्हिंग पथक (VVT) 2 यांचा समावेश आहे. स्थिर सर्व्हेक्षण पथकांमार्फत कोड्याचे माळ, कुमठे फाटा, पाचवा मैल, वायफळे व यमगरवाडी फाटा या ठिकाणी अनधिकृत पैसे, वस्तू, शस्त्रे व वाहतूक यांवर विशेष लक्ष ठेवून तपासणी करण्यात येणार आहे.निवडणूक कामकाजासाठी आवश्यक ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, नामनिर्देशन, छाननी, माघार व चिन्ह वाटपाची प्रक्रिया तहसिलदार तासगांव यांचे दालन, पहिला मजला, तहसिल कार्यालय तासगांव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ तासगांव येथे पार पडणार आहे.प्रशासनाच्या या व्यापक तयारीमुळे तासगांव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 शांततेत,पारदर्शक व लोकशाही मूल्यांना बळकटी देणाऱ्या पद्धतीने पार पडेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या