तासगाव : येथील तासगाव–सांगली रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सूर्यवंशी गल्ली, गुरुवार पेठ,तासगाव येथील रहिवासी आक्काताई भगवान काळे (वय अंदाजे 56) असे मयत महिलेचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आक्काताई काळे या तासगाव औद्योगिक वसाहतीतील एका भांडी कारखान्यात कामाला होत्या.नेहमीप्रमाणे कामाची सुट्टी झाल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या असताना तासगाव–सांगली रोडवर पाठीमागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत आक्काताई काळे यांना रिक्षातून तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र, गंभीर मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.या घटनेमुळे मयत महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,परिसरात शोककळा पसरली आहे.पोलिसांनी नागरिकांना अपघाताबाबत काही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या